पेशावर – पाकिस्तानातून फरार झालेला दहशतवादी मंगल बाग अफगाणिस्तानात एका बॉम्बस्फोटात मारला गेला आहे. अमेरिकेसाठी मंगल बाग हा मोस्ट वॉंटेड दहशतवादी होता. मंगल बागवर अमेरिकेने 30 लाख अमेरिकन डॉलर म्हणजेच 21 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
बंदी घालण्यात आलेल्या लष्कर-ए- इस्लाम या आतकंवादी संघटनेशी मंगल बागचा संबंध होता. तो अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता. एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार अफगाणिस्तानातील नांगरहार प्रांताचे गवर्नर जियाउलहक अमरखिल यांनी मंगल बागच्या मृत्यूच्या वृत्तास दुजोरा दिला आहे.नांरहारमधील आकिन जिल्ह्यातील बंदर दारा भागात एका रस्त्यांच्या बाजूला झालेल्या अपघातात मंगल बागसह त्याच्या दोन साथीदाराचा मृत्यू झाला आहे.
मंगल बाग दहशतवादाकडे वळण्यापूर्वी ट्रकवर क्लीनर म्हणून काम करायचा. त्यानंतर मंगल बाग प्रतिबंधित तहरीक-ए-तालिबाल पाकिस्तान या दहशतवादी संघटनेशी जोडला गेला होता. तो पाकिस्तानातील खैबर जिल्ह्यातील रहिवासी होता. पाकिस्तानी सैन्याने सर्च ऑपरेशन सुरु केल्यानंतर मंगल बाग फरार झाला होता. तो गेल्या काही वर्षांपासून अफगाणिस्तानात राहत होता.
मंगल बागची दहशतवादी संघटना खैबरमधील बारा तालुक्यामध्ये 2008 पर्यंत कार्यरत होती. पाकिस्तान सरकारने त्याच्यावर 20 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. खैबरमध्ये मंगल बाग स्वत: न्यायालय चालवत असे. 2006 पासून तो लष्कर-ए-इस्लाम या संघटनेचे नेतृत्व करत होता. तो पाकिस्तान आणि अफगाणिस्तानाच्या काही भागात कार्यरत होता.