पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला, 6 सुरक्षा जवान शहीद, 11 जखमी

पेशावर: अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात शुक्रवारी पहाटे दहशतवाद्यांनी सुरक्षा चौकीवर हल्ला केला. सुरक्षा चौकीला लक्ष्य करून दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात सहा सुरक्षा जवान शहीद झाले तर 11 जण जखमी झाले. अधिकाऱ्यांनी या दहशतवादी हल्ल्याची माहिती दिली. प्रतिबंधित दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक –
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांच्या एका गटाने दक्षिण वझिरीस्तान जिल्ह्यातील लढा तहसीलमधील मिश्ता गावात एका चेक पोस्टवर हल्ला केला, यात सहा सुरक्षा कर्मचारी ठार झाले आणि 11 जण जखमी झाले. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, दहशतवाद्यांना पकडण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. याशिवाय, दुसऱ्या घटनेत, दक्षिण वझिरीस्तान जिल्ह्यातील आझम वारसाक भागात शुक्रवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली, यामध्ये सात दहशतवादी ठार झाले, तर दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले.
यापूर्वीही झालेत हल्ले –
दहशतवाद्यांनी सुरक्षा चौकीला लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. मागील महिन्यात (ऑगस्ट 2024) देखील दहशतवाद्यांनी खैबर पख्तूनख्वामधील सुरक्षा चौकीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात किमान सात पाकिस्तानी सुरक्षा कर्मचारी ठार झाले असून 11 जण जखमी झाले आहेत. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर असलेल्या तिराह खोऱ्यात हा हल्ला झाला होता.
पाकिस्तानचे शेजारी देशावर आरोप –
दरम्यान, पाकिस्तानचे म्हणणे आहे की, तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानशी संबंधित दहशतवाद्यांचे लपण्याचे ठिकाण अफगाणिस्तानमध्ये आहे, पाकिस्तानी भूमीवर हल्ला केल्यानंतर ते तेथे जातात. मात्र, तालिबान सरकारने हा दावा नेहमीच फेटाळला आहे. तालिबान सरकारच्या वतीने असेही सांगण्यात आले आहे की, पाकिस्तानने कधीही अफगाणिस्तानमध्ये टीटीपीच्या उपस्थितीचे पुरावे दिलेले नाहीत. इस्लामाबादने आपल्या कमकुवतपणासाठी अफगाणिस्तानला दोष देऊ नये.





