ताम्हिणी घाटात कारचा भीषण अपघात; २०० फूट खोल दरीत कोसळली कार; तिघांचा जागीच मृत्यू

पुणे : माणगाव-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात कारचा भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. अपघातग्रस्त कार तब्बल १५० ते २०० फूट खोल दरीत कोसळली असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. मृत तिन्ही प्रवासी वाशीम जिल्ह्यातील आहेत. जखमींवर माणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
सविस्तर वृत्त असे की, वाशीम जिल्ह्यातील काही युवक कोकण पर्यटनासाठी गेले होते. परतीच्या वाटेवर असताना माणगाव पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात कारचा अपघात झाला. २०० फूट खोल दरीत कार कोसळली. यामध्ये गाडीचा चुराडा झाला.
या अपघातात ऋषभ चव्हाण, सौरभ हिंगे, कृष्णा राठोड यांचा जागीच मृत्यू झाला हे सर्व मृतक वाशीम जिल्ह्यातील आहेत. रोशन गाडे, प्रवीण सरकटे व रोशन चव्हाण हे गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्यावर माणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.





