मुख्याध्यापकाचे भयानक कृत्य; मुलींना रजिस्टर पाहण्यासाठी बोलवायचा अन् अश्लील चाळे करायचा

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील कुक्कामेटा जिल्हा परिषद शाळेत धक्कादायक घटना घडली आहे. या शाळेतील मुख्याध्यापकाने चक्क तिसरी आणि पाचवीत शिकणाऱ्या मुलींसोबत लैंगिक चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नराधम शिक्षकाला अटक केली आहे. याबाबत पीडित मुलींच्या आईने लाहेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रविंद्र गव्हारे असे मुख्याध्यापकाचे नाव आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मुख्याध्यापक गव्हारे हा एका-एका मुलींना रजिस्टर पाहण्याच्या बहाण्याने आपल्या कक्षात बोलावत असे आणि त्या मुलींशी अश्लील चाळे करायचा. याबाबत कोणाला काही सांगितल्यास शाळेतून काढून टाकण्याची आणि मारण्याची धमकी तो देत असे. त्यामुळे, मुख्याध्यापकांच्या धमकीने घाबरलेल्या मुलींनी पालकांना देखील याबाबत सांगितले नाही.
पण, काही मुलींनी शाळेत जाण्यास नकार दिल्यानंतर पालकांनी त्यांना विश्वासात घेऊन विचारले असता, हा प्रकार समोर आला. असे पीडित मुलीच्या आईने दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेने जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्याध्यापक रविंद्र गव्हारे याच्याविरूद्ध बाल लैंगिक अत्याचार आणि ॲट्रॉसिटी कलमांखाली गुन्हा दाखल करुन त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.





