समृद्ध महामार्गावर भीषण अपघात; भरधाव क्रूझरचा टायर फुटून दोघांचा मृत्यू

सिंदखेडराजा : समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा परिसरात क्रूझर वाहनाचा टायर फुटून भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत क्रूझर वाहनातील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज ८ मार्च रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात विद्याबाई साबळे (वय-५५) आणि मोतीराम बोरकर (वय-६०) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
तसेच भावना रमेश राऊत (वय-३०), प्रतिभा अरुण वाघोडे (वय-४५) आणि मीराबाई गोटफोडे (वय-६५) हे गंभीर जखमी झाले आहेत. महामार्ग ॲम्बुलन्सच्या डॉ. यासीन शहा, वैभव बोराडे आणि चालक दिगंबर शिंदे यांच्या पथकाने जखमींना तातडीने जालना येथील रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील आसेगाव देवी येथील भाविक शिर्डी दर्शनासाठी निघाले असताना त्यांचा क्रूझर (एमएच-२५आर-३५७९) वाहनाचा टायर फुटला. वाहन वेगात असल्याने ते सुरक्षा कठड्याला धडकून पलटी झाले. या अपघातानंतर मागून येणाऱ्या दुसऱ्या एका कारचे (एमएच-२९-सीबी-९६३०) नियंत्रण सुटल्याने ती देखील क्रूझरवर जोरात आदळली.
क्रूझरमधील संतोष साखरकर, कमलाबाई जाधव, सुशीला जाणार, मिराबाई राऊत, छायाबाई चव्हाण, प्रमिला घाटोले, भक्ती राऊत, रमेश राऊत, बेबीबाई येलोत यांना सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. दरम्यान, क्रेटा कारमधील प्रवासी सुदैवाने बचावले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस पीएसआय गजानन उज्जैनकर, हेड कॉन्स्टेबल मुकेश जाधव आणि सिंदखेडराजा पोलीस ठाण्याचे अधिकारी संदीप डोंगरे, विष्णू नागरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. क्यूआरव्ही टीमचे पवन काळे, खंडू चव्हाण, अभिषेक कांडेकर आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे मच्छिंद्र राठोड, अविनाश राठोड, अजय पाटील यांनी मृत आणि जखमींना बाहेर काढून वाहतूक सुरळीत केली.
कल्याणमध्ये ब्रेक निकामी झाल्याने अपघात
कल्याण पूर्वेला भरधाव मिक्सर ट्रकचे अचानक ब्रेक खराब झाल्याने मोठा अपघात झाला आहे. कल्याण पूर्वेकडील पुणे लिंक रोडवर आज सकाळी साडेसहाच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. मिक्सर ट्रक बुडलिंक रोडवरून चक्की नाक्याच्या दिशेने जात होता. दरम्यान, ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. ट्रकच्या धडकेत चार रिक्षा आणि एक छोटा टेम्पोला जबर धडक बसली. या अपघाताचा एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे. ही धडक इतकी भीषण होती की टेम्पो आणि रिक्षा अक्षरशः चुरा झाले होते.





