वसमत-औंढा रस्त्यावरील किन्होळा पाटीजवळ भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेत दोघांचा मृत्यू

हिंगोली : वसमत ते औंढा नागनाथ मार्गावरील किन्होळा पाटीजवळ मंगळवारी (15 जुलै 2025) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेले दोघेही वसमत येथील मंगळवारपेठ परिसरातील रहिवासी होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याच्या माहितीनुसार, मंगळवारपेठ येथील अंकुश महाजन जैन आणि त्याचा मित्र शुभम महाजन हे दुचाकीवरून औंढा नागनाथहून वसमतकडे येत होते. किन्होळा पाटीजवळ वसमतकडून औंढाकडे जाणाऱ्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात अंकुश आणि शुभम गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, जमादार भगवान आडे, रामा लोखंडे, आंबादास विभुते, शहाजी बामणीकर, विजय वऱ्हाडे आणि विजयकुमार उपरे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दोघांना तातडीने वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मयत अंकुश महाजन खासगी वाहनचालक होता आणि त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. शुभम महाजन खासगी विमा कंपनीचा एजंट होता, त्यांच्या पश्चात आई, वडील आणि दोन भाऊ आहेत. अपघाताची माहिती कळताच नातेवाइकांनी रुग्णालयात गर्दी केली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.





