pune news : जुन्या कात्रज घाटातील अपघातात दोघांचा मृत्यू

पुणे – जुन्या कात्रज घाटातील भिलारेवाडी वळणाजवळ भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक तरुणी जखमी झाली. दुचाकीवरून ट्रीपल सीट जाणाऱ्या तिघांच्या अंगावरून पीएमपी बस गेल्याने हा अपघात झाला. सकाळी पावणे नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
आकाश रामदास गोगावले (वय २९ , रा. ससेवाडी, भोर) आणि अनुष्का प्रकाश वाडकर ( २७ ) यांचा जागीच मृत्यू झाला, नेहा कैलास गोगावले (२०) ही गंभीर जखमी झाली. जखमीवर भारती हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात बस चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी सांगितले की, आकाश हा एका कंपनीत काम करतो तर अनुष्का आणि नेहा पुणे शहरातील महाविद्यालयात शिक्षण घेतात, ते एकमेकांचे नातेवाईक असून ससेवाडी येथे राहतात. सकाळी आकाश कामावर निघताना दोघीही त्याच्या सोबत पुणे शहरात येण्यास निघाल्या. आकाशची दुचाकी भिलारेवाडी येथे आली असता,
समोरील वाहनाने अचानक ब्रेक दाबला, यामुळे आकाशनेही ब्रेक दाबून दुचाकी थांबवली. मात्र, मागून भरधाव वेगान आलेल्या पीएमपी बसने त्यांना चिरडले. यामध्ये आकाश आणि अनुष्काचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पीएमटी बसचालक सुधीर दिलीप कोंडे (वय ४२, रा. आर्वी, पुणे) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, आंबेगाव पोलिसांनी घटनास्थळी झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली.





