उधमपूरमध्ये भीषण अपघात: जवानांची बस 200 फूट दरीत कोसळली; 3 सैनिकांचा मृत्यू, 15 जखमी, एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल

जम्मू – जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूरमध्ये सीआरपीएफच्या जवानांना घेवून जाणारी बस 200 फूट खोल दरीत कोसळल्याची दुर्घटना घटना घडली आहे. या अपघातात तीन सैनिकांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत. जखमी सैनिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 187व्या बटालियनची बस उधमपूर जिल्ह्यातील कडवाहून बसंत गडला जात असताना आज सकाळी 10.15 वाजता सुमारे 200 फूट खोल दरीत कोसळली. बसमध्ये एकूण २३ सैनिक प्रवास करत होते. यातील तीन सैनिकांचा मृत्यू झाला असून 15 सैनिक जखमी झाले आहेत. सर्व जखमींना विमानाने उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एडीसी उधमपूर प्रेम सिंह यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, सकाळी अपघातानंतर एका तासाच्या आत सर्व जखमींना दरीतून बाहेर काढण्यात आले आहे. तसेच गंभीर जखमींना एअरलिफ्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा अपघात कसा झाला याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, परंतु कच्चा रस्ता आणि खराब हवामान हे अपघाताचे कारण असू शकते. अपघातानंतर तातडीने मदत आणि बचाव कार्य राबवून स्थानिक लोकांनी जखमींना मदत करून महत्त्वाची आणि प्रशंसनीय भूमिका बजावली आहे.





