सरकारने भारत पेट्रोलियमच्या विक्रीसाठी मागवल्या निवीदा

नवी दिल्ली – केंद्र सरकारने सरकारी कंपन्या विक्री करण्याच्या प्रस्तावाला आता वेग द्यायचे ठरवले असून भारत पेट्रोलियम या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या तेल कंपनीतील आपले 52.98 टक्के समभाग विकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याच्या विक्रीसाठी सरकारने आता निवीदा मागवल्या आहेत. येत्या 2 मे पर्यंत या निवीदा सादर करण्याची मुदत सरकारने ठेवली आहे. हे भाग भांडवल खरेदी करणाऱ्या कंपनीकडे भारत पेट्रोलियमची मालकी जाणार आहे.
या निवीदा सादर करण्यासाठी अन्य कोणत्याही दुसऱ्या सरकारी मालकीच्या कंपनीला अनुमती दिली जाणार नाही. म्हणजेच या कंपनीचे आता पुर्ण खासगीकरण केले जाणार आहे. ज्या कंपनीची स्वताची नक्त मालमत्ता 10 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी आहे त्याच कंपन्यांना यात बोली लावता येणार आहे.
भारत पेट्रोलियम कंपनीची स्वताची मालमत्ता 87 हजार 388 कोटी रूपये इतकी असून त्यात सरकारच्या मालकीचा वाटा 46 हजार कोटी रूपये इतका आहे. अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात सरकारी कंपन्या विकून 2.1 लाख कोटी रूपयांचा निधी उभारण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. देशात जे एकूण इंधन विकले जाते त्याच्या एकूण 21 टक्के इंधन या भारत पेट्रोलियकम कंपनीतर्फे विकले जाते.





