Satara | पेट्रोल पंपचालकांना सुरक्षेचा अहवाल सादर करण्याची सूचना

सातारा, (प्रतिनिधी) – हिंदुस्थान पेट्रालियम कार्पोरेशन, इंडियन ऑइल कार्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम कार्पोरेशन या कंपनीच्या विक्री अधिकार्यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांच्या भूमिगत टाक्यांची तात्काळ तपासणी करावी.
टाक्यांमध्ये पावसाचे पाणी जात नसल्याची खातरजमा आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक बाबींची तपासणी करून, अहवाल सादर करावा, अशा सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केल्या आहेत.
इथेनॉलमिश्रीत पेट्रोल विक्रीच्या अनुषंगाने श्रीमती राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस हिंदुस्थान पेट्रालियमचे विक्री अधिकारी शिखर श्रीवास्तव, इंडियन ऑइलचे मयंक अग्रवाल, भारत पेट्रोलियमचे सुभाष गुप्ता, विपुल शहा, रितेश रावखंडे, प्रदीप सागावकर, रमेश हलगेकर, प्रकाश पारेख, केदार नाईक आणि जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
श्रीमती राजमाने म्हणाल्या, पेट्रोल पंपचालकांनी सुरक्षेच्या दृष्टीने कोणती काळजी घ्यावी, याबाबतच्या सूचना तेल कंपन्यांच्या अधिकार्यांनी द्याव्यात. इथेनॉलमिश्रीत पेट्रोल वाहनांमध्ये असल्याने, सर्व्हिसिंग करताना, गाड्या धुताना किंवा इतर काही कारणास्तव या पेट्रोलचा पाण्याशी संपर्क आल्यास त्यामधील इथेनॉल पेट्रोलपासून विभक्त होते आणि ते पाण्यासह गाड्यांच्या टाक्यांच्या तळाशी साचते.
त्यामुळे गाड्या सुरू (स्टार्ट) करताना किंवा चालवताना वाहनचालकांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे वाहनांच्या टाक्यांमधील पेट्रोलचा पाण्याशी संपर्क येणार नाही, याची काळजी प्रत्येक वाहनधारकाने घ्यावी. याबाबत माहितीफलक प्रत्येक पेट्रोल पंपावर लावण्यात यावेत.
इथेनॉलमिश्रीत पेट्रोलची साठवण व हाताळणीसाठी आवश्यक मानकांनुसार पेट्रोल पंपांवर पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात, जेणेकरून वाहनांच्या इंधन क्षमतेवर परिणाम होणार नाही, याची खबरदारी कंपन्यांच्या विक्री अधिकार्यांनी घ्यावी, असे निर्देशही श्रीमती राजमाने यांनी दिले.
पावसाळ्यात इथेनॉलमिश्रीत पेट्रोलमध्ये पाणी गेल्याने वाहनांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी होत आहेत. त्यामुळे पंपचालक व वाहनधारकांमध्ये वाद होत आहेत. या परिस्थितीत कंपन्याकडून आवश्यक खबरदारी घेण्यात यावी, अशी मागणी जिल्हा पेट्रोल डिझेल वितरक असोसिएशनच्यावतीने करण्यात आली.




