नेवासा : नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवी शिवारात शेळ्या मेंढ्याच्या कळपावर अचानक सोमवारी (दि.२१) रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास विज कोसळून दहा शेळ्यांसह दोन मेंढ्या जागीच ठार झाल्या तर चार मेंढ्या जखमी झाल्याची घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की रांजणगावातील मेंढपाळ बांधव नेहमीप्रमाणे आपले शेळ्या मेंढ्यांचे कळप चरण्यासाठी घेऊन रांजणगावातील सामाजिक वनीकरण परिसरात गेले होते. दुपारी दोन वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरू झाल्याने काही मेंढपाळ बांधव आजूबाजूला आडोशाला थांबले तर काही मेंढपाळ बांधव मेंढराच्या काळपाजवळ थांबलेले होते. आकाशात अचानक ढगांचा जोरदार कडकडाट सुरू असताना मोठा आवाज होऊन वीज मेंढर उभी असलेल्या झाडावर कोसळली. त्यामुळे दहा शेळ्या व दोन मेंढ्या जागीच ठार झाल्या तर चार मेंढ्या जखमी झाल्याची घटना रांजणगांव येथे भर दुपारी मेंढपाळांच्या डोळ्यासमोर घडल्यामुळे मेंढपाळ बांधव भयभीत होऊन बाजूला पळाले. या नंतर मेंढपाळांनी सदरच्या घटनेची माहिती गावातील नागरिकांना कळवली त्यानंतर सरपंच ग्रामसेवक व संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर नेवासा तालुका पशुवैद्यकीय अधिकारी गायकवाड व त्यांच्या पथकाने रांजणगांव येथे येऊन सर्व मृत शेळ्या – मेंढ्यांचे शवविच्छेदन केले. या घटनेची माहिती मिळताच युवा नेते उदयन गडाख यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित कुटुंबांना आर्थिक मदत केली. तसेच युवा नेते विष्णू मुरकुटे यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून संबंधितांना विचारपूस केली. धनगर समाजाचे नेते अशोकराव कोळेकर यांनीही यावेळी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली व धनगर बांधवांचे सांत्वन केले. युवा नेते उदयन गडाख यांनी तहसीलदार यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधून संबंधितांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळवून देण्याचे सांगितले. आपण देखील शासकीय मदत मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी गडाख यांनी उपस्थितांना सांगितले. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेमुळे रांजणगाव परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी गावचे सरपंच सोपान लोखंडे,ग्रामविकास अधिकारी रमेश गायके, उपसरपंच दावीद जावळे, बाबासाहेब आल्हाट यांच्यासह ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.