कामोठे टोलनाक्यावर टेम्पो पकडला, 17 लाखांचा गुटखा जप्त!

पनवेल – नवी मुंबई पोलीस दलाच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाच्या पोलीसांनी सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजता शीव पनवेल महामार्गावर कामोठे टोलनाक्याजवळ एका टेम्पोमध्ये १७ लाख ४० हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. या प्रकरणी टेम्पो चालकाला अटक केली आहे. या प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नवी मुंबई, पनवेल येथील पानटप-यांपर्यंत गुटखा विक्री प्रतिबंधित असताना सुद्धा सूरक्षितरित्या पोहचविणारी बेकायदेशीर यंत्रणा कार्यान्वित आहे. या टोळीबद्दल नवी मुंबई पोलीस दलाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिका-यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी कामोठे पोलिसांच्या माध्यमातून शीव पनवेल महामार्गावर सापळा रचला.
सोमवारी सायंकाळी कामोठे टोलनाक्याजवळ टेम्पोला पोलिसांनी थांबवून त्याच्याकडे चौकशी केली. टेम्पोमध्ये २० मोठ्या पिवळ्या रंगाच्या गोण्या आढळल्या. या पिवळ्या गोण्यांमध्ये सुद्धा प्रत्येकी ६ पांढ-या रंगाच्या गोण्या आढळल्या. त्या प्रत्येक पांढ-या रंगाच्या गोणीमध्ये ५८ वेगवेगळी पाकीटे गुटख्याची आढळली. या प्रकरणी गुटखा वाहतूक करणा-या २३ वर्षीय टेम्पोचालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.




