आळंदीतील मंदिर परिसर आणि मुख्य रस्त्यांची रात्री साफसफाई – मुख्याधिकारी माधव खांडेकर

आळंदी: आळंदी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी पदभार स्वीकारताच शहराच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग आणि शहरातील मुख्य रस्त्यांची साफसफाई आता रात्रीच्या वेळी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरू झाली असून, भाविकांना स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणात दर्शनाचा अनुभव मिळावा, हा यामागील उद्देश आहे.
माऊलींच्या दर्शनासाठी आणि प्रदक्षिणेसाठी सकाळी मोठ्या संख्येने भाविक आळंदीत येतात. यापूर्वी सकाळी 7 वाजता सुरू होणारी साफसफाई प्रक्रिया दिवसभर साचलेला कचरा आणि रहदारीमुळे भाविकांना त्रासदायक ठरत होती. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुख्याधिकारी खांडेकर यांनी रात्रीच्या वेळी साफसफाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे सकाळी मंदिर परिसर आणि रस्ते स्वच्छ राहतील आणि भाविकांना कोणताही अडथळा जाणवणार नाही.
रात्री स्वच्छ होणारे रस्ते:
1. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसर
2. आळंदी नगरपरिषद रोड ते वाय जंक्शन
3. वाय जंक्शन ते चाकण चौक
4. चाकण चौक ते वडगाव चौक
5. वडगाव चौक ते मरकळ चौक
6. मरकळ चौक ते पोलीस स्टेशन
7. पोलीस स्टेशन ते नगरपरिषद
नागरिकांना आवाहन:
मुख्याधिकारी खांडेकर यांनी नागरिकांना कचरा जागोजागी न टाकता घंटागाडीतच टाकण्याची विनंती केली आहे. यापुढे ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्याचा नगरपरिषदेचा मानस आहे. तसेच, रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आळंदी ही देवाची भूमी स्वच्छ आणि सुंदर राहावी, यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
माधव खांडेकर म्हणाले, “भाविकांचा अनुभव सुधारणे आणि शहर स्वच्छ ठेवणे हे आमचे प्राधान्य आहे. रात्रीच्या साफसफाईमुळे हे दोन्ही उद्दिष्ट साध्य होईल.” आळंदी नगरपरिषदेच्या या उपक्रमाला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.





