Pimpri : जाधववाडीत ज्ञानमंदिर की दारूचा अड्डा?

चिखली : जिथे एकेकाळी चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या हसण्याचा, शिक्षणाचा गजर घुमत होता, त्या जाधववाडीतील साई जीवन प्राथमिक शाळेचे वर्ग आता तळीरामांचा अड्डा बनले आहेत. वर्गात दारूच्या बाटल्या, प्लॅस्टिक ग्लास, चिप्सच्या रिकाम्या पाकिटांचा खच पडला आहे. गुटखा थुंकून भिंती रंगवल्या जात आहेत. ही शाळा आता शिक्षण मंदिर न राहता समाजाच्या अधोगतीचे दर्शन घडवणारा काळा कोपरा ठरत आहे.
पूर्वी कन्या शाळा म्हणून वापरात असलेली ही इमारत काही काळ उर्दू शाळेसाठी वापरण्यात आली. मात्र त्या विद्यार्थ्यांचे वडाच्या मळ्यातील नव्या इमारतीत स्थलांतर झाल्याने हे वर्ग पूर्णपणे बंद झाले. पण या वर्गांच्या मागेच माध्यमिक विभागाची नियमित शाळा भरते. मागे शाळा सुरू, पुढे तळीरामांचा अड्डा… हे चित्र दुर्दैवी आहे.
शाळेला दिवसा सुरक्षारक्षक असला तरी रात्री कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे या ठिकाणी मद्यप्राशन, गुटखा सेवन सुरू आहे. उघड्या खिडक्या-दरवाजांचा गैरफायदा घेत मद्यप्रेमी इथे रात्री वास्तव्य करतात. महापालिका आयुक्तांना पूर्णवेळ सुरक्षारक्षक नेमावा, यासाठी लवकरच पत्र देणार असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते सांगत आहेत.
या परिसरात आधीही बैलगाडा घाट, रामायण मैदान, पाण्याची टाकी यांसारख्या निर्जन ठिकाणी तळीरामांची वर्दळ होतीच. आता त्यात शाळेचा देखील समावेश झाला आहे. दिवसा तळ ठोकून बसणारे, रात्री मद्यप्राशन करणारे आणि वाद घालणारे हे तळीराम भविष्यात एखाद्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकतात.
जाधववाडी परिसर झपाट्याने नागरीकरणाकडे जात असताना प्रशासनाने वेळेत पावले उचलून बंद शाळेच्या इमारतीचे संरक्षण करणे गरजेचे आहे. नागरिकांतही या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
सध्या या बंद असलेल्या खोल्या एनजीओ मार्फत सी. एस. आर. फंडामधून अद्यावत खोल्या तयार करणार आहे. शाळा परिसराला पूर्ण भिंतीची कंपाउंड बांधण्याकरता आयुक्तांना पत्रव्यवहार केला आहे. पूर्ण वेळ सुरक्षा रक्षक नियुक्त करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. सध्या तिथे अंधार असल्याने रात्री वरांड्यात काहीजण बसत असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु हे ज्ञान मंदिर आहे त्यात असे प्रकार घडणे उचित नाही, याकरिता आम्ही आयुक्तांशी पत्रव्यवहार यापूर्वी केला आहे. लवकरच कार्यवाही अपेक्षित आहे.
– अश्विनी जाधव, माजी नगरसेविका, भाजप
शाळा हे ज्ञानाचे मंदिर असून या परिसरात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत काही तळीराम बंद असलेल्या वर्गात दारू पितात तसेच गुटखा खाऊन थुंकून परिसर घाण करत आहेत. तळीराम नशेत असल्यावर त्याच्यात काही कारणावरून भांडणे होतात. यापूर्वी शाळेपासून जवळच असलेल्या बैलगाडा घाटात काही वर्षांपूर्वी एक खून झाला होता. पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी. या विद्या मंदिराचा अशा प्रकारे होत असलेला अवमान कोणीही सहन करणार नाही. याकरिता आयुक्तांशी पत्रव्यवहार केला आहे.
– विशाल आहेर, युवा नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी





