Temperature records: सप्टेंबर महिन्यात तापमानाचे रेकाॅर्ड
Temperature records:

इंदापुरात ३५.७ अंश सेल्सिअस नोंद; गेल्या ६ वर्षांतील उच्चांक
Temperature records: ऐन मान्सूनच्या हंगामात पावसाने पाठ फिरवल्यामुळे पुणे जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी (दि. १५ सप्टेंबर) इंदापूर येथे उच्चांकी ३५.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
मागील ६० वर्षांनंतरचा सप्टेंबर महिन्यातील हे सर्वोच्च रेकॉर्ड आहे. यापूर्वी १२ सप्टेंबर १९६६ मध्ये जिल्ह्यात ३६ अंश तापमान नोंदवले गेले होते. या तापमानवाढीमुळे इंदापूरसह बारामती, पुरंदर आणि आंबेगाव तालुक्यात ऑक्टोबर हीट सहन करावी लागत आहे.
सप्टेंबर महिन्यात पुणे जिल्ह्यात सरासरी तापमान ३१ ते ३२ अंशांच्या आसपास असते. यापूर्वी १ सप्टेंबर २०२० रोजी तापमान ३३ ते ३४ अंशांच्या दरम्यान गेले होते व त्या वेळी जिल्ह्यात ३४.५ अंश सेल्सिअसची उच्चांकी नोंद झाली होती. मात्र, आज इंदापूरने ६ वर्षांपूर्वीचा हा रेकॉर्ड मोडीत काढत थेट १९६६ च्या उच्चांकापर्यंत झेप घेतली आहे.
मंगळवारी जिल्ह्यात इंदापूर पाठोपाठ बारामती येथे ३३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर दौंड, आंबेगाव आणि पुरंदर तालुक्यांतही पारा ३२ ते ३३ अंशांच्या आसपास राहिला.
मागील आठवड्यातही बारामतीचे तापमान ३४ अंशांच्या पार गेले होते. मात्र, त्यानंतर झालेल्या पावसामुळे तापमानात दोन ते तीन अंशांनी घट झाली होती. आता गेल्या ४८ तासांत पावसाने पुन्हा विश्रांती घेतल्यामुळे हवेतील उष्णता वाढली असून, तापमानाने हा नवा उच्चांक गाठला आहे. ऐन मान्सूनच्या हंगामात मार्च-एप्रिलसारखा कडक उन्हाचा चटका जाणवत आहे.
दरम्यान, शहर परिसरात कमाल तापमान ३० ते ३१ अंशाच्या असपास नोंदविले. त्यामुळे दिवसभर उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवत होता. पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.





