आंध्र प्रदेशात तेलगु देसम- जनसेना पक्षाचे जागावाटप जाहीर

नवी दिल्ली – आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी चंद्राबाबू नायडू यांचा तेलगु देसम पक्ष अर्थात टीडीपी आणि अभिनेता पवन कल्याण यांचा जनसेना पक्ष यांच्यातही युती झाली असून दोन्ही पक्षांनी विधानसभेच्या ११८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात टीडीपीच्या ९४ तर जनसेनेच्या २४ उमेदवारांचा समावेश आहे.
टीडीपीच्या यादीत २३ नव्या चेहऱ्यांचा समावेश असून त्यांना पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार आहे. या पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि पवन कल्याण यांनी आज जागावाटपाची घोषणा केली. आंध्र प्रदेश विधानसभेच्या एकूण १७५ जागा असून सरकार स्थापन करण्यासाठी किमान ८८ जागा जिंकणे आवश्यक आहे.
विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ ११ जून २०२४ रोजी समाप्त होत असून हे दोन्ही पक्ष प्रथमच एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत. २०१९ च्या निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर कॉंग्रेसने सर्वाधिक जागा जिंकत सरकार स्थापन केले होते व जगनमोहन रेड्डी राज्याचे मुख्यमंत्री आहेत.
आमची युती ही राज्याच्या भविष्यासाठी असून एक महान प्रयत्नासाठी उचललेले हे पहिले पाउल असल्याचे आपल्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत नायडू यांनी सांगितले.
दरम्यान, उर्वरित ५७ जागांच्या संदर्भात दोन्ही पक्षांकडून लवकरच घोषणा केली जाणार आहे. जागावाटपातील सहमतीनुसार राज्यातील लोकसभेच्या २५ जागांपैकी ३ जागा जनसेना लढवणार आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात निवडणूकपूर्व आघाडीबाबत भारतीय जनता पार्टीशीही बोलणी सुरू असल्याचे नायडू यांच्या पक्षातील सूत्रांनी सांगितले.





