“शरद पवार साहेबांनी किती देऊळ बांधली सांगा, राहुल गांधींचा तर…”; नारायण राणेंचा हल्लाबोल

Narayan Rane on Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse | सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर 8 महिन्यापूर्वी बांधण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने राजकीय वातावरण तापले आहे. यावरून विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. यावर प्रत्युत्तर देताना नारायण राणे यांनी थेट शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
नारायण राणे म्हणाले की, ”शरद पवार साहेबांनी किती देऊळ बांधली सांगा, यांना चांगलं काहीचं दिसत नाही. मेलेल्या माणसाच्या टाळूवरच लोणी खाणारी माणसं आहेत. राहुल गांधींचा तर धर्म कोणता आहे हेच कळत नाही. जे विरोधक आता पुतळ्याबाबत बोलत आहेत त्यांनी 8 महिन्यांत पुतळा कसा झाला आहे, हे बघितलं का? त्याला एखादा हार घातला का?, ” असा सवालही राणेंनी उपस्थित केला आहे.
नारायण राणे म्हणाले, “विरोधकांना, प्रामुख्याने काँग्रेसला यावर बोलण्याचा अधिकारच नाही. काँग्रेस कोणत्या क्षेत्रात बदनाम झालेली नाही. असं एखादं क्षेत्र सांगा जिथे काँग्रेस बदनाम झाली नाही. काँग्रेस बेरोजगारीच्या मुद्द्यावरून आमच्यावर टीका करत आहे. मात्र त्यांच्या काळात देशात किती बेरोजगारी होती हे त्यांना आठवतंय का? काँग्रेसवाले घरी बसून शिवाजी महाराजांबद्दल बोलत आहेत. त्यांनी कधी शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिला आहे का? कधी महाराजांना नमस्कार केला आहे का?”
‘घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी
नारायण राणे म्हणाले की, ”घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मी उद्या १२ वाजता घटनास्थळी जाऊन पाहणी करणार असून त्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहे. काल एक निष्ठावंत आमदार बांधकाम विभागाचे ऑफिस बंद झाल्यानंतर फोडण्यासाठी गेला होता. तो सकाळी मातोश्रीवर असतो तर संध्याकाळी एकनाथ शिंदे यांच्याकडे असतो,” असं म्हणत ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फूटी पूर्णाकृती पुतळा 8 महिन्यात कोसळल्याच्या घटनेनंतर अहमदनगरमध्ये मराठा समाजाच्यावतीने राज्य सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये अनेक किल्ले आणि पुतळे उभारण्यात आले त्या पुतळ्यांना साधी चीर देखील पडली नाही, मात्र महायुती सरकारने उभारलेला पुतळा साडेतीनशे दिवसाच्या आत कोसळल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा:





