बिहार निकालाबाबत तेजस्वी यादव यांचा मोठा दावा म्हणाले,”येथील निकाल हे..”

नवी दिल्ली – बिहारमध्ये महाआडीत जागावाटपाची चर्चा सुरू असून लवकरच जागावाटप जाहीर केले जाईल. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या जागावाटपाच्या अगोदर येथे आमचे जागावाटप झालेले असेल. आम्ही अगदी भक्कमपणे लोकसभेची निवडणूक लढू आणि येथील निकाल हे सगळ्यांना चकित करणारे असतील असा दावा बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केला.
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू यादव यांनी पंतप्रधान मोदी यांच्या हिंदू असण्याच्या संदर्भात केलेल्या विधानाबाबत बोलताना तेजस्वी म्हणाले की आम्ही पण हिंदू आहोत आणि घरात पुजा करतो.
आमच्या घरातही मंदिर आहे. कोणाचा मृत्यू झाला तर मुंडन करतो. लालू यादव यांनी एवढेच म्हटले आहे की ते राम आणि रहिमच्या भक्तांना परस्परांशी लढवतात मग मुंडन का करत नाहीत?
भाजपच्या मेरा परिवार अभियानाच्या संदर्भात बोलताना तेजस्वी म्हणाले की आंदोलन करणाऱ्यांवर ते लाठ्या चालवतात. ते आंदोलक त्यांच्या कुटुंबाचे सदस्य नाहीत का? भाजपने कायमच महागाई, गरिबी आणि रोजगाराच्या मुद्द्यावरून पळ काढण्याचे काम केले आहे. आम्ही बिहारमध्ये १७ महिने सत्तेत होतो तेंव्हा अनेक कामे केली. अनेकांना नियुक्ती पत्रे दिली. आता मात्र कोणतेच काम होत नाही. नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही झालेला नाही.




