Tejasswi Prakash: हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्वी प्रकाश नेहमीच आपल्या अभिनयामुळे तसेच परखड वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अलीकडेच तिने ‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत एक मोठा खुलासा केला आहे. भूमिकेसाठी टक्कल करायलाही तयार असल्याचं ती म्हणाली आहे. तेजस्वीला विचारण्यात आलं की, एखाद्या भूमिकेसाठी जर टक्कल करण्याची गरज भासली तर तू तयार असशील का? यावर ती म्हणाली, “हो, मी करू शकते. जर एखाद्या पात्रासाठी गरज असेल, तर मी टक्कलदेखील करायला तयार आहे. मी अशा गोष्टींसाठी नेहमीच तयार असते.” ती पुढे म्हणाली, “आज इंडस्ट्रीमध्ये ट्रान्सफॉर्मेशनसाठी अनेक पर्याय आहेत. केसांचा रंग बदलणे, टक्कल दाखवणे, सोनेरी केस दाखवणे यांसाठी वेगवेगळे उपाय लोक वापरतात. अजून तरी मला प्रत्यक्षात कुणी असं करण्यास सांगितलेलं नाही, पण भविष्यात गरज भासलीच तर मी नक्कीच ते करेन.” तेजस्वी प्रकाशने हिंदी टेलिव्हिजनवर ‘स्वरागिनी’, ‘नागीन ६’, ‘थपकी प्यार की’, ‘कसम’, ‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’ यांसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. तिने मराठी चित्रपट ‘स्कूल कॉलेज आणि लाईफ’, ‘मन कस्तुरी रे’ यांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. व्यक्तिगत आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर तेजस्वी सध्या अभिनेता करण कुंद्रासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. या दोघांची ओळख ‘बिग बॉस’च्या घरात झाली आणि त्याचेच नाते आज एक मजबूत संबंधात रूपांतरित झाले आहे. तेजस्वी प्रकाश त्या पर्वाची विजेती देखील ठरली होती.