Tejashwi Yadav : सत्ताधाऱ्यांकडुन निवडणुकीत 40 हजार कोटींची उधळण; तेजस्वी यादव यांचा आरोप
आम्हाला रोखण्यासाठी सत्ताधारी एनडीएने तब्बल 40 हजार कोटी रुपये खर्च केले, असा आरोप आरजेडीचे कार्याध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी आज विधानसभेत केला.

Tejashwi Yadav : बिहार विधानसभा निवडणुकीत जनशक्तीचा पराभव झाला असून यंत्रणेचा विजय झाला आहे. आम्हाला रोखण्यासाठी सत्ताधारी एनडीएने तब्बल 40 हजार कोटी रुपये खर्च केले, असा आरोप आरजेडीचे कार्याध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी आज विधानसभेत केला.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान त्यांनी सत्ताधारी नितीश कुमार सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने जाहीर केलेल्या विविध योजना आणि सवलतींचा संदर्भ देत ते म्हणाले की, हे लोकशाहीचे नव्हे तर डर तंत्राचे (भीतीचे राज्य) शासन आहे.
निवडणुकीत अफाट पैसा खर्च करून लोकशाहीला ओलीस धरण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. सध्या काळ तुमचा असेल, पण आमची वेळही लवकरच येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना दिला.महिलांना देण्यात आलेल्या मदतीवरूनही त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
निवडणुकीपूर्वी महिलांना १०,००० रुपयांचे वाटप करून मते मिळवणाऱ्या भाजपने सत्तेत येताच महिलांचा अपमान केल्याचे त्यांनी म्हटले. उत्तराखंडमधील एका भाजप नेत्याच्या पतीकडून बिहारमधील मुलींबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा दाखला देत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या बहेन-बेटी सन्मानाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
याव्यतिरिक्त, पाटण्यातील नीट परीक्षार्थी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू आणि लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणावरून त्यांनी बिहारमधील कायदा व सुव्यवस्थेवर टीका केली. बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळवून देण्यात आणि आरक्षणाची मर्यादा वाढवून त्याचा समावेश नवव्या अनुसूचीमध्ये करण्यात नितीश सरकार अपयशी ठरल्याचे ते म्हणाले. निवडणुका संपताच केंद्र सरकारला बिहारचा विसर पडला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
हे पण वाचा : Ladki Bahin Yojana: हप्ते रखडलेल्या लाडक्या बहिणींना एकत्रित 4500 रुपये मिळणार; उपमुख्यमंत्री शिंदेंची घोषणा






