Tejashwi Yadav : संघटित भ्रष्टाचारामुळे रेशन विक्रेते अडचणीत; तेजस्वी यादव यांचा आरोप
आरजेडी नेते आणि बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी बुधवारी मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना पत्र लिहून संघटित भ्रष्टाचारामुळे सार्वजनिक वितरण प्रणालीतील रेशन विक्रेते अडचणीत असल्याचा आरोप केला.

Tejashwi Yadav : आरजेडी नेते आणि बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी बुधवारी मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना पत्र लिहून संघटित भ्रष्टाचारामुळे सार्वजनिक वितरण प्रणालीतील रेशन विक्रेते अडचणीत असल्याचा आरोप केला. विक्रेत्यांच्या मागण्यांवर तातडीने आणि पारदर्शकपणे निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली.
पत्रात तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी रेशन विक्रेत्यांना दरमहा ३० हजार रुपयांचे निश्चित किमान मानधन देण्याची मागणी केली आहे. तसेच प्रलंबित कमिशनची त्वरित अदायगी, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांवरील कालमर्यादा रद्द करणे आणि बिहार राज्य अन्न महामंडळाच्या गोदामांमधील कथित भ्रष्टाचारावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
मालाचे वजन व माप यांसारख्या तांत्रिक समस्यांचे त्वरित निराकरण करावे, तसेच विक्रेत्यांवरील अनावश्यक प्रशासकीय छळ आणि दंडात्मक कारवाई थांबवावी, असे यादव यांनी म्हटले.
जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा उभारण्याची मागणीही त्यांनी केली. विक्रेत्यांच्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सरकार, विभागीय अधिकारी आणि फेअर प्राइस डीलर्स असोसिएशनच्या प्रतिनिधींच्या नियमित त्रिपक्षीय बैठका घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
आठ कलमी मागण्यांवर त्वरित, सकारात्मक आणि कालमर्यादित निर्णय घ्यावा, अशी विनंती यादव (Tejashwi Yadav) यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. ही व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सरकारने संवेदनशीलतेने आणि पारदर्शकतेने कार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले.






