Tejashwi Yadav : जुमला हा आक्षेपार्ह शब्द आहे का? तेजस्वी यादव यांचा संतप्त सवाल

पाटणा : महाराष्ट्रात गुन्हा दाखल झाल्याच्या घडामोडीवर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी शनिवारी तीव्र प्रतिक्रिया दिली. जुमला हा आक्षेपार्ह शब्द आहे का? मी केवळ सत्य मांडत आहे आणि यापुढेही मांडतच राहणार, असे त्यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बिहारचा दौरा केला. त्याआधी मोदींवर निशाणा साधणारी पोस्ट राजदचे नेते तेजस्वी यांनी सोशल मीडियावरून प्रसिद्ध केली.
जनतेला मोदींकडून दिली जाणारी आश्वासने म्हणजे केवळ जुमला (शाब्दिक खेळ) असल्याचे त्यांनी म्हटले. त्या पोस्टवरून महाराष्ट्राच्या गडचिरोलीमधील भाजप आमदार मिलिंद नरोटे यांनी पोलिसांत तक्रार दिली. तेजस्वी यांची मोदींविषयीची टिप्पणी आक्षेपार्ह असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावरून पोलिसांनी तेजस्वी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला. त्या घडामोडीवर तेजस्वी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
गुन्हा दाखल झाल्याने घाबरण्याचे कुठले कारण नाही. त्यांना वाटेल तेवढे गुन्हे ते माझ्याविरोधात दाखल करू शकतात, असे तेजस्वी बिहारमध्ये एका ठिकाणी बोलताना म्हणाले. त्यांनी संबंधित पोस्टमध्ये मोदींचा उल्लेख मतचोर म्हणून केला. त्यावरून तेजस्वी यांच्या विरोधात उत्तरप्रदेशातही गुन्हा दाखल करण्यात आला.





