‘लालू प्रसाद यादव यांना भारतरत्न द्यायला हवा’, तेजस्वी यादव यांचे वक्तव्य; म्हणाले,’ जे आज शिव्या देत आहेत…’

Lalu Prasad Yadav | ‘जे लोकं आज लालू प्रसाद यादव यांना शिव्या देत आहेत, तेच उद्या त्यांना भारतरत्न देतील’, असे वक्तव्य बिहारचे माजी उपमुख्यमंत्री राजद नेते तेजस्वी यादव यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगू लागली आहे.
नुकतेच राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी चेंगराचेंगरीच्या घटनेवरून ‘कुंभ फालतू आहे, त्याला काही अर्थ आहे का?’ असे वक्तव्य केल्याने नवीन वाद निर्माण झाला होता. आता तेजस्वी यादव यांनी ते भारतरत्न पुरस्कारासाठी पात्र असल्याचे वक्तव्य केल्याने लालू प्रसाद यादव पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत. तेजस्वी यांनी वडिलांना भारतरत्न द्यायला हवी अशी मागणी केल्यानंतर जनता दल युनायटेडकडून जोरदार टीका केली जात आहे.
बिहारच्या सीतामढी जिल्ह्यात समाजवादी नेते कर्पूरी ठाकुर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना तेजस्वी यादव म्हणाले की, त्यांचे वडील लालू प्रसाद यादव यांनी समाजातील वंचित घटकांच्या आवाजासाठी लढा दिला आहे, त्यामुळे ते भारतरत्न पुरस्कारासाठी पात्र आहेत.
#WATCH | Sitamarhi, Bihar | RJD leader Tejaswi Yadav says, “Those who used to abuse Karpoori Thakur when he implemented reservation, look at his power today, those who used to abuse him are now giving him Bharat Ratna, this is the real power of socialism… Those who are abusing… pic.twitter.com/1upL51y9nE
— ANI (@ANI) February 17, 2025
तेजस्वी यादव म्हणाले की, ‘आरक्षण लागू करण्यासाठी जे लोकं कर्पूरी ठाकुर यांना शिव्या देत होते, ते आज त्यांना भारतरत्न देत आहेत. आज मी त्यांना हे सांगू इच्छितो की, जे लोक आज मोदींच्या प्रचारासाठी लालू यादव यांना शिव्या देत आहेत, एक दिवस असा येईल की तेच लोक त्यांना भारत रत्न देतील.’
कर्पूरी ठाकुर यांच्या कामाला लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांनी पुढे नेले. त्यांनी आरक्षण वाढवून 18 टक्के केले. त्यानंतर भाजपाने आजपर्यंत त्यात वाढ केलेली नाही., असेही ते म्हणाले.
दरम्यान, तेजस्वी यादव यांच्या या वक्तव्यानंतर जनता दल युनायटेडच्या नेत्यांकडून निशाणा साधण्यात आला आहे. ‘भ्रष्टाचार आणि जेलमध्ये शिक्षा भोगण्यासाठी कोणता पुरस्कार असेल, तर लालूजी नक्कीच यासाठी प्रयत्न करू शकतात’, असे म्हणत जेडीयूचे नेते नीरज कुमार यांनी निशाणा साधला.





