सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान पहिल्यांदाच शेअर करणार स्क्रीन; ‘या’ चित्रपटाच्या माध्यमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या चांगल्या विषयांवर आधारित चित्रपट येताना दिसत आहेत. सध्या असाच एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान हे पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटाविषयी अधिक जाणून घेऊयात…
तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्या या चित्रपटाचे नाव ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ असे आहे.चित्रपटाचे नाव ऐकूनच जरा विचारात पडला असाल ना? हॅशटॅग हा आजचा ट्रेंडिंगमधला शब्द आहे तर तदेव लग्नम हा संस्कृत शब्द त्यामुळे या दोघांचा परस्परांशी काय संबंध आहे? असे अनेक प्रश्न सध्या प्रेक्षकांना सतावत असतील. हीच उत्सुकता कायम ठेवत, हा भन्नाट विषय घेऊन तरुणाईला आणि त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ सज्ज झाला आहे. या चित्रपटात लग्नातील धमाल पाहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान हे प्रथमच एकत्र येत आहेत.
कधी रिलीज होणार चित्रपट?
शुभम फिल्म्स प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटामध्ये सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आनंद दिलीप गोखले यांनी केले आहे तर शेखर विठ्ठल मते यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून येत्या ४ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान या जोडीला प्रेक्षक पसंत करतात का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





