Tej Pratap Yadav : तेजप्रताप यादव यांची बिहारमध्ये स्वतंत्र आघाडी; 5 लहान पक्षांची मिळाली साथ

पाटणा : राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची डोकेदुखी वाढवणारे आणखी एक राजकीय पाऊल त्यांचे थोरले पुत्र तेजप्रताप यांनी मंगळवारी उचलले. त्यांनी आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी स्वतंत्र आघाडी स्थापन केली. त्यासाठी त्यांना ५ लहान पक्षांची साथ मिळाली.
तेजप्रताप यांच्या अयोग्य वर्तनामुळे त्रस्त झालेल्या लालूंनी काही दिवसांपूर्वी त्यांची राजदमधून हकालपट्टी केली. मात्र, त्यामुळे विचलित न झालेल्या आणि विद्यमान आमदार असणाऱ्या तेजप्रताप यांनी याआधी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. आता आणखी पुढे जात त्यांनी आघाडी स्थापन केली आहे. त्यामध्ये विकास वंचित इन्सान पार्टी, भोजपुरिया जनमोर्चा, प्रगतीशील जनता पार्टी, संयुक्त किसान विकास पार्टी आणि वाजिब अधिकार पार्टी हे पक्ष सहभागी झाले आहेत.
तेजप्रताप यांनी पत्रकार परिषदेत आघाडीच्या स्थापनेची घोषणा केली. त्यावेळी संबंधित पक्षाचे प्रमुखही उपस्थित होते. मी माझ्या स्वत:च्या मार्गावरून चालेल, अशी भूमिका तेजप्रताप यांनी मांडली. आता आगामी निवडणुकीत त्यांची आघाडी राजदविरोधात उमेदवार रिंगणात उतरवणार का याविषयी मोठी उत्सुकता असेल. बिहारमध्ये राजद विरोधी पक्षांच्या महाआघाडीचे नेतृत्व करत आहे.





