‘तेरा जैसा यार कहा’ गाणं गायलं अन् तहसीलदार निलंबित; व्हायरल व्हिडिओने खळबळ

नांदेड : शासकीय कार्यालयात खुर्चीवर बसून ‘तेरा जैसा यार कहा’ हे गाणं गाणं नांदेड जिल्ह्यातील उमरी तहसीलच्या तत्कालीन तहसीलदार प्रशांत थोरात यांना चांगलंच महागात पडलं आहे. त्यांच्या निरोप समारंभातील हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर महसूल विभागाने कठोर पाऊल उचलत त्यांना तात्काळ निलंबित केलं. या कारवाईने नांदेडच्या प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
प्रशांत थोरात हे उमरी तहसील कार्यालयात तहसीलदार म्हणून कार्यरत होते. ८ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांची लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे बदली झाली. त्यांच्या जागी मंजुषा भगत यांनी तहसीलदारपदाची सूत्रे स्वीकारली. बदलीपूर्वी उमरी तहसील कार्यालयात थोरात यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या समारंभादरम्यान थोरात यांनी आपल्या कार्यालयातील अधिकृत खुर्चीवर बसून ‘तेरा जैसा यार कहा’ हे गाणं गायलं. यावेळी ते सहकाऱ्यांशी गप्पा मारत आणि हातवारे करताना दिसले. हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आणि त्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.
महसूल मंत्र्यांचा कठोर इशारा
व्हायरल व्हिडिओमुळे शासनाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर केला. या अहवालाच्या आधारे विभागीय आयुक्तांनी प्रशांत थोरात यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला.
महसूल मंत्री बावनकुळे यांनी याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. “प्रशांत थोरात यांचे वर्तन एका जबाबदार शासकीय अधिकाऱ्याला शोभणारे नाही. शासकीय कार्यालयात असे वर्तन शासन आणि प्रशासनाची प्रतिमा मलिन करते. प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या पदाची गरिमा, वेळ आणि प्रसंग यांचे भान ठेवणे आवश्यक आहे. कौटुंबिक किंवा खासगी समारंभात अशा सादरीकरणाला मुभा असली, तरी शासकीय व्यासपीठावर मर्यादा पाळणे अपेक्षित आहे,” असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. त्यांनी सर्व शासकीय अधिकाऱ्यांना पदाची प्रतिष्ठा जपण्याचे आवाहनही केले.
व्हायरल व्हिडिओमुळे कारवाई
निरोप समारंभादरम्यान थोरात यांनी गाणं गाताना केलेले हावभाव आणि सहकाऱ्यांशी गप्पा मारण्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यामुळे प्रशासनावर टीका होऊ लागली. नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी तपास करून थोरात यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस केली. त्यानुसार, विभागीय आयुक्तांनी थोरात यांना रेणापूर येथील तहसीलदारपदावरून निलंबित केले.





