Luxury Watch: ४० हजारांच्या घड्याळासाठी जगभरात उत्साह; कुठे बॅरिकेड्स तुटले तर कुठे पोलिसांना सोडावा लागला अश्रुधूर
Luxury Watch या घड्याळाचं आणखी एक मोठं आकर्षण म्हणजे त्याची रिसेल व्हॅल्यू. अनेक लोक हे घड्याळ वापरण्यासाठी नव्हे, तर पुढे जास्त किमतीत विकण्यासाठी खरेदी करत आहेत. लॉन्चनंतर काही तासांतच हे घड्याळ ऑनलाइन वेबसाइट्सवर मूळ किमतीपेक्षा खूप जास्त दराने विकलं जाऊ लागलं.

Luxury Watch: दिल्लीपासून लंडन, दुबई आणि न्यूयॉर्कपर्यंत एका घड्याळाने असा क्रेझ निर्माण केला की, अनेक ठिकाणी गोंधळ आणि धक्काबुक्कीची परिस्थिती निर्माण झाली. विशेष म्हणजे हे घड्याळ लाखो रुपयांचं नसून सुमारे ४० ते ४५ हजार रुपयांच्या किमतीचं आहे. तरीही हे घड्याळ खरेदी करण्यासाठी लोकांनी रात्रभर दुकानाबाहेर रांगा लावल्या. काही ठिकाणी बॅरिकेड्स तुटले, तर फ्रान्समध्ये पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधूर सोडावा लागला.
या घड्याळामागचं मुख्य कारण म्हणजे प्रसिद्ध स्विस लक्झरी ब्रँड ‘ऑडेमार्स पिगे’ आणि लोकप्रिय ‘स्वॉच’ कंपनी यांचं खास सहकार्य. ऑडेमार्स पिगे या ब्रँडच्या घड्याळांची किंमत सामान्यतः लाखो रुपयांत असते. त्यामुळे सर्वसामान्य लोकांसाठी ती घड्याळं फक्त पाहण्यापुरती मर्यादित असतात. मात्र यावेळी या ब्रँडची लक्झरी डिझाइन कमी किमतीत उपलब्ध करण्यात आली. त्यामुळे या घड्याळासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली.
कंपनीने हे घड्याळ फक्त निवडक स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध केलं. ऑनलाइन विक्री न ठेवता मर्यादित स्टॉक ठेवण्यात आला. त्यामुळे “पहिले या, पहिले मिळवा” अशी परिस्थिती निर्माण झाली आणि लोकांनी दुकानांबाहेर मोठ्या रांगा लावल्या.

The Swatch x Audemars Piguet ‘Royal Pop’
भारतामध्ये दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू येथे लोक रात्रीपासूनच दुकानाबाहेर थांबले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंमध्ये लोक दुकानात घुसण्याचा प्रयत्न करताना दिसले. काही ठिकाणी धक्काबुक्कीमुळे गोंधळ उडाला. दुबईमध्ये परिस्थिती इतकी बिघडली की सुरक्षा कारणास्तव लॉन्च कार्यक्रमच रद्द करण्यात आला.
फ्रान्समध्ये शेकडो लोक दुकानाबाहेर जमा झाल्याने पोलिसांना अश्रुधूर सोडावा लागला. वाढती गर्दी पाहून दुकानं बंद करण्यात आली. लंडनमध्येही कंपनीने आपली सहा स्टोअर्स तात्पुरती बंद केली. न्यूयॉर्कमध्येही मोठी गर्दी झाल्याने काही काळ विक्री थांबवावी लागली.
या घड्याळाचं आणखी एक मोठं आकर्षण म्हणजे त्याची रिसेल व्हॅल्यू. अनेक लोक हे घड्याळ वापरण्यासाठी नव्हे, तर पुढे जास्त किमतीत विकण्यासाठी खरेदी करत आहेत. लॉन्चनंतर काही तासांतच हे घड्याळ ऑनलाइन वेबसाइट्सवर मूळ किमतीपेक्षा खूप जास्त दराने विकलं जाऊ लागलं.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गर्दीच्या आणि गोंधळाच्या व्हिडीओंमुळे या घड्याळाची लोकप्रियता आणखी वाढली. त्यामुळे हे फक्त एक घड्याळ न राहता “लक्झरी स्टेटस” आणि मोठा नफा कमावण्याचं प्रतीक बनलं आहे.





