Chief Justice Bhushan Gavai – भारतासारख्या मोठ्या आणि विविध देशात न्याय मिळवण्यास सुलभ करण्यासाठी तंत्रज्ञान खूप मोठी भूमिका बजावू शकते असे ते म्हणाले. भारतीय न्यायव्यवस्थेने तंत्रज्ञानाचा वेगाने स्वीकार केला आहे जेणेकरून अधिकाधिक लोकांना न्याय मिळू शकेल. तंत्रज्ञान ही दुधारी तलवारीसारखी आहे. निर्णय प्रक्रियेची जागा घेण्यासाठी नाही तर न्यायालयीन कामकाज सुधारण्यासाठी वापरली पाहिजे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले आहे. सोमवारी केंब्रिज विद्यापीठात ‘न्याय उपलब्धतेमध्ये तंत्रज्ञानाची भूमिका’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. न्या. गवई म्हणाले, आपल्याला हे देखील स्वीकारावे लागेल की तंत्रज्ञान दुधारी तलवार म्हणून काम करू शकते, ज्यामुळे असमानता आणखी वाढू शकते. एक मोठी चिंता म्हणजे ‘डिजिटल डिव्हिडंट’, जिथे ज्यांना आधीच न्याय मिळण्यात अडचणी येत आहेत ते इंटरनेट, उपकरणे आणि डिजिटल ज्ञानाच्या समान प्रवेशाअभावी मागे राहू शकतात. जर तंत्रज्ञानाचा खऱ्या अर्थाने न्यायासाठी वापर करायचा असेल, तर समता आणि समावेश हा त्याच्या नियोजनाचा आधार असला पाहिजे. तथापि, न्या. गवई म्हणाले की धोरणात्मक हस्तक्षेपाशिवाय न्याय वितरण व्यवस्थेत कोणतीही क्रांती घडवून आणता येणार नाही. तंत्रज्ञानावर आधारित मध्यस्थी निर्णयांसाठी मानवी देखरेख, अल्गोरिदमिक पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करणारी एक प्रशासन चौकट विकसित केली पाहिजे.