पुणे | तंत्रशिक्षणच्या शिष्यवृत्तीची होणार पडताळणी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – तंत्रशिक्षण विभागाच्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळत असल्याने विद्यार्थ्यांचे इंजिनिअर, फार्मसी, आर्किटेक्चर, एमसीए, एमबीए आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण पूर्ण होत आहे. मात्र, राज्य शासनाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांची अंमलबजावणी संस्थांकडून व्यवस्थितरीत्या होते की नाही, याची पडताळणी करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्थांना अचानक भेट देऊन तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे शिक्षण संस्थांनी शिष्यवृत्तीच्या कागदपत्रांसह सर्व नोंदी अद्ययावत ठेवाव्यात, असे निर्देश पुणे विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक डाॅ. जाधव यांनी दिले आहेत.
तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाकडून शिष्यवृत्तीची योजना आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांचे निम्मे शुल्क राज्य शासनाकडून भरले जाते. त्यामुळे या शिष्यवृत्ती योजनेमुळे विद्यार्थ्यांचे व्यावसायिक शिक्षण पूर्ण करण्यास मदत होत आहे. पात्र विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्तीचे वाटप येत्या १५ दिवसांत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित ठेवू नका
महाडीबीटी संकेतस्थळावरील डॅशबोर्डनुसार पुणे विभागीय कार्यालय अंतर्गत संस्थास्तरावर३ हजार ३०९ अर्ज प्रलंबित असून, विद्यार्थ्यांकडे दुरुस्तीसाठी परत पाठविलेले ३ हजार ७९३ अर्ज प्रलंबित असल्याचे निदर्शनास येत आहे.
त्यानुसार संस्थांकडून अद्यापपर्यंत एकूण ७ हजार १०२ अर्ज येणे अपेक्षित आहे. हे सर्व अर्ज तत्काळ तपासून पाठवून द्यावेत. जेणेकरून शासनाकडून प्राप्त झालेला निधी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना वितरित करण्यास विलंब होणार नसल्याचे तंत्रशिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.




