स्वराज्याच्या सर्जिकल स्ट्राईकची गोष्ट सांगणाऱ्या ‘फत्तेशिकस्त’चा थरारक टिझर रिलीज

‘फर्जंद’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक दिगपाल लांजेकर आता इतिहासातलं एक सोनेरी पान उलगडू पाहत आहेत. युवा पिढीला आपल्या अलौकिक इतिहासाचा उलगडा व्हावा म्हणून ‘फर्जंद’ नंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुशल युद्धनीतीचे दर्शन घडविणारा ‘फत्तेशिकस्त’ चित्रपट लवकरच इतिहासप्रेमींच्या भेटीस येणार आहे.
दरम्यान, नुकताच ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटाचा थरारक टिझर रिलीज करण्यात आला आहे. ‘फत्तेशिकस्त’ हा चित्रपट शिवाजी महाराजांनी फत्ते केलेल्या अशाच एका थरारक गनिमी काव्यावर आधारित आहे. चित्रपटात अभिनेता ‘चिन्मय मांडलेकर’ छत्रपती शिवाजी महाजरांची भूमिका साकारणार आहे.
मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, निखिल राऊत, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर यांसारख्या मातब्बर कलाकारांची भट्टी ‘फत्तेशिकस्त’च्या निमित्ताने पुन्हा एकदा जुळून आली आहे. शिवाय हिंदी चित्रपट-मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा अनुप सोनी सुद्धा या चित्रपटाद्वारे मराठी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणार आहे.





