#TeamIndia #CWC23 : अश्विनवर शिवरामकृष्णनची बोचरी टीका, म्हणाले “तो स्वार्थी खेळाडू असून अक्सर पटेल जर…”

चेन्नई : – भारताचा ऑफ स्पीन गोलंदाज रवीचंद्रन अश्विन हा अत्यंत स्वार्थी खेळाडू आहे. त्याचा भारताच्या एकदिवसीय संघात समावेश केल्यावर संघाला सातत्याने यश मिळेल हा खूप मोठा गौरसमज आहे, अशी बोचरी टीका भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व समालोचक लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी केली आहे.
केवळ वैयक्तीक कामगिरी सुधारावी व प्रत्येक सामन्यात खेळपट्टी आपल्याच गोलंदाजीला मदत करणारी ठरावी असा त्याचा हट्ट असतो. अक्सर पटेल जर तंदुरुस्त ठरला असता तर त्यालाच विश्वकरडंकसाठी संघात स्थान दिले गेले असते. केवळ पटेल दुखापतग्रस्त असल्याने अश्विनला संधी मिळाली यात त्याचे वैयक्तीक कतृत्व काहीही नाही, असेही शिवरामकृष्णन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अक्षर पटेलला आशिया चषका दरम्यान बांगलादेश विरुदधच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्याच्या मांडीचा स्नायू दुखावला. त्यानंतर आशिया चषकाच्या अंतिम सामन्यातही तो खेळू शकला नव्हता. त्यानंतर या दुखापतीतून तो वेळेवर सावरला नसल्यामुळे भारताने आपल्या 15 जणांच्या संघात अंतिम क्षणी एक बदल केला आणि अक्षर पटेलच्या जागी रवीचंद्रन अश्विनचा संघात समावेश केला. भारतीय संघाचा विश्वचषकातील पहिला सामना 8 ऑक्टोबरला चेन्नईत ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे.
अश्विनची वनडे सामन्यातील कारकीर्द…..
अश्विनने टीम इंडियासाठी 115 वनडे सामने खेळले आहेत. या 115 सामन्यांमध्ये अश्विनने 4.95 च्या इकॉनॉमी आणि 33.2 च्या सरासरीने 155 विकेट घेतल्या आहेत. 25 धावांत चार विकेट, ही अश्विनची वनडेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. त्याशिवाय गरज पडल्यास आर. अश्विन फलंदाजीतही योगदान देऊ शकतो. अश्विनने वनडेमध्ये 86.96 च्या स्ट्राइक रेटने आणि 16.44 च्या सरासरीने 707 धावा केल्या आहेत.
एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय संघ – रोहीत शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल, ईशान किशन, सुर्यकुमार यादव, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमरा, महम्मद सिराज, शार्दूल ठाकूर व महम्मद शामी.





