Team India : इराणी चषकात शानदार कामगिरी, तरीही न्यूझीलंडविरूध्दच्या मालिकेसाठी ‘या’ स्टार खेळाडूच्या निवडीबाबत साशंकता कायम…

India vs New Zealand Test Series 2024 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. पहिला कसोटी सामना 16 ऑक्टोबरपासून बेंगळुरूमध्ये खेळवला जाणार आहे. न्यूझीलंड मालिकेसाठी टीम इंडियाची लवकरच घोषणा केली जाऊ शकते, मात्र संघाची घोषणा होण्यापूर्वीच स्टार खेळाडूला या मालिकेत संधी मिळण्याबाबत साशंकता कायम आहे. मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरची न्यूझीलंड कसोटी मालिकेत निवड होण्याची शक्यता कमी आहे. श्रेयस अय्यरने नुकतेच इराणी चषक स्पर्धेत बॅटने आपली ताकद दाखवली.
गेल्या आठवड्यात लखनौ येथे झालेल्या इराणी चषक सामन्यात विजयी मुंबई संघासाठी अर्धशतक झळकावणारा श्रेयस अय्यरचे भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्याचे स्वप्न अपुरे राहणार आहे असे दिसते. श्रेयस अय्यरची न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी निवड होण्याची शक्यता नाही, कारण पहिल्या दोन रणजी सामन्यांसाठी त्याची मुंबई संघात निवड करण्यात आली आहे तर दुसरीकडे सर्फराज खानची मुंबई संघात निवड झाली नाही, म्हणजेच न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याची निवड जवळपास निश्चित आहे.
इराणी चषकापूर्वी दुलीप ट्रॉफीमध्येही श्रेयस अय्यरने चमकदार कामगिरी केली होती. त्याने इंडिया क आणि इंडिया ब विरुद्ध अर्धशतके झळकावली. मुंबईच्या निवड समितीने पहिल्या दोन सामन्यांसाठी संघाची निवड केली आहे. गतविजेत्या मुंबईचा सामना 11 ऑक्टोबरपासून बडोद्याशी होईल, तर 18 ऑक्टोबरपासून घरच्या मैदानावर महाराष्ट्राशी सामना होईल.
फेब्रुवारीमध्ये खेळली होती शेवटची कसोटी…
श्रेयस अय्यरने फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. तेव्हापासून तो कसोटी संघातून बाहेर आहे. बांगलादेश मालिकेतही त्याला संघात स्थान देण्यात आले नव्हते.





