Team India tour of South Africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी लवकरच संघ निवड…

Team India tour of South Africa – भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. या दौऱ्यात संघ एकदिवसीय, टी-20 तसेच कसोटी सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. यासाठी भारतीय संघाची निवड येत्या दोन ते तीन दिवसांत अपेक्षीत असून नियमित कर्णधार रोहित शर्मासह सर्व प्रमुख खेळाडू संघात परतणार आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत सरस कामगिरी केलेल्याही काही खेळाडूंची वर्णी संघात लागण्याची शक्यता आहे.
भारतीय संघाचा यंदाच्या वर्षातील हा अखेरचा परदेश दौरा ठरणार आहे. पुढील आठवड्यात या दौऱ्यातील टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील बीसीसीआयच्या निवड समितीला दोन मोठे निर्णय घ्यायचे आहेत. जे विराट कोहली आणि रोहित शर्माच्या टी-20 पुनरागमनाबाबत असतील.
एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी संघांची घोषणा एकाच वेळी केली जाईल. मात्र, भारत अ संघाच्या मालिकेपर्यंत कसोटी संघाची घोषणा लांबणीवर टाकली जाण्याचेही संकेत मिळत आहेत. रोहित व कोहली दोघेही 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघात परतणार आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारत ‘अ’ संघातील काही खेळाडूंबाबतही निर्णय निवड समिती घेण्याची शक्यता आहे.
संघ निवडीबाबत सोमवारी चर्चा करण्यात येईल. या चर्चेदरम्यान अनेक गोष्टी आहेत पण कसोटीपूर्वी आम्ही टी-20 आणि एकदिवसीय सामने खेळणार असल्यामुळे ती संघ निवड आधी जाहीर केली जाणार आहे. त्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या टी-20 मधील निवडीबाबतही चर्चा केली जाणार आहे.
India tour of South Africa : कोहली घेणार विश्रांती तर रोहितबाबत अद्याप संभ्रम…
कोहली घेणार विश्रांती…
दरम्यान, भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज विराट कोहली याने बीसीसीआयकडे एक विनंती केली आहे, त्याने पुढील काही काळ टी-20 व एखदिवसीय सामन्यांतून विश्रांती मागितली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या मालिकेत तो खेळणार नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी तो संघात परतेल, असेही वर्तवले जात आहे. कोहली सध्या लंडनमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.
भारतीय संघाचे दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक…. (India tour of South Africa, 2023-24)
टी-20 मालिका….
पहिला सामना – 10 डिसेंबर, डर्बन
दुसरा सामना – 12 डिसेंबर, केबेर्हा
तिसरा सामना – 14 डिसेंबर, जोहान्सबर्ग
एकदिवसीय मालिका…
पहिला सामना – 17 डिसेंबर, जोहान्सबर्ग
दुसरा सामना – 19 डिसेंबर, केबेर्हा
तिसरा सामना – 21 डिसेंबर, पार्ल
कसोटी मालिका…
पहिला सामना – 26 ते 30 डिसेंबर, सेंच्युरीयन
दुसरा सामना – 3 ते 7 जानेवारी, केपटाऊन
रोहितबाबत संभ्रम
तर दुसरीकडे रोहित शर्माबाबत मात्र, संभ्रम कायम आहे. आपण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 व एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत खेळणार किंवा नाही हे त्याने बीसीसीआयला अद्याप कळवलेले नाही. कोहलीने जसा निर्णय कळवला आहे तसा रोहितने मर्यादित षटकांच्या क्रिकेटबाबत अद्याप जाहीर केलेले नाही. तो सुद्धा कोहलीप्रमाणे सध्या लंडनमध्येच सुट्टीवर आहे. मात्र, तो टी-20 मालिकेत सहभागी झाला नाही तरी एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी संघात परतेल असे सांगितले जात आहे.





