Victory Parade : बीसीसीआयकडून टीम इंडियाला 125 कोटींचा धनादेश सुपूर्द, विराट-रोहित झाले भावूक…

Victory Parade for Team India : टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया मायदेशात परतली आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्यानंतर टीम इंडिया मुंबईत दाखल झाली. मुंबईत टीम इंडियाची भव्य व्हिक्ट्री परेड निघाली. यादरम्यान संघाचे सदस्य ट्राफीसह खुल्या बसमध्ये बसून विजयी मिरवणुकीत सहभागी झाले होते. यानंतर बीसीसीआयने वानखेडे स्टेडियमवर खेळाडूंचा सत्कार करून 125 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
सत्कार समारंभ आटोपल्यानंतर खेळाडूंनी वानखेडे स्टेडियमच्या मैदानावर गोल फिरत चाहत्यांचे आभार मानले आणि प्रेक्षकांना सही केलेले चेंडू दिले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सत्कार समारंभात भारतीय संघातील खेळाडूंना 125 कोटी रुपयांचा धनादेश दिला. दरम्यान, संघाच्या विजयानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघातील सदस्यांसाठी 125 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते ते आज सुपुर्द केले.
रोहितला इतका भावूक कधीच पाहिला नाही – कोहली
रोहितच्या भावनिक होण्याबाबत कोहली म्हणाला, मला इंटरनेट ब्रेकिंगबद्दल माहिती नाही, पण माझ्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत मी रोहितला इतका भावूक झालेला पाहिला नाही. मी ड्रेसिंग रूममध्ये जात होतो आणि रोहित बाहेर येत होता. दोघेही भावुक झाले आणि एकमेकांना मिठी मारली. तो क्षण माझ्यासाठी खास असेल.
कोहली पुढे म्हणाला, जेव्हा आम्ही 2007 किंवा 2011 मध्ये विश्वचषक जिंकला तेव्हा सीनियर खेळाडू खूप रडले होते, पण मी त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकलो नाही आणि ते का भावूक होत आहेत याचा विचार करत होतो. पण आता आम्ही सिनियर झालो आहोत, आणि त्यावेळच्या त्या क्षणाचे उत्तर मला मिळालं आहे.
T20 World Cup 2024 : टीम इंडिया मायदेशात परतल्यानंतर काय-काय झालं? पहा, सर्व फोटो एका क्लिकवर…
मी असो की रोहित, दोघेही बराच काळ ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रयत्नशील होतो. प्रथम माझ्या नेतृत्वाखाली आणि नंतर रोहितच्या नेतृत्वाखाली. आम्ही दोघेही ही ट्रॉफी जिंकण्यासाठी आतुर होतो, पण कोणत्या ना कोणत्या कारणाने आम्ही जिंकू शकलो नाही. आता आम्ही जिंकलो हे आमच्यासाठी खास आहे. जिंकल्यानंतर वानखेडेवर परतणे हे देखील आमच्यासाठी खास आहे. विराट कोहली शेवटी म्हणाला, मी चाहत्यांचे आभार मानू इच्छितो. ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही. गेले चार दिवस खूपच शानदार गेले.





