nagar | शिक्षक मतदारसंघ ; जिल्ह्यात १९ प्रारुप मतदान केंद्र निश्चित

नगर (प्रतिनिधी) – निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यात १९ प्रारुप मतदान केंद्रांची निश्चित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणुकीचे सहायक निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली.
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारुप मतदान केंद्राच्या हरकतीबाबत सर्व राजकीय पक्षांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या निवडणुकीसाठी बुधवार (दि.१५) रोजी अधिसूचना जारी केली जाईल. या निवडणुकीकरिता बुधवार (दि.२२) पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी शुक्रवार, (दि.२४) रोजी केली जाईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार (दि.२७ मे अशी आहे.
सोमवार, १० जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल. गुरूवार, १३ जून २०२४ रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया (दि.१८) जून रोजी पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी सालीमठ यांनी यावेळी दिली.
तालुकानिहाय मतदान केंद्र
अकोले तालुका-1, संगमनेर-2, राहाता-2, कोपरगाव-2, श्रीरामपुर-1 नेवासा-1, शेवगाव-1, कर्जत-1, जामखेड-1, श्रीगोंदा-1, पारनेर-1, राहुरी-1, अहमदनगर शहर-2, अहमदनगर ग्रामीण-1 व पाथर्डी तालुक्यात 1 अशा एकुण १९ प्रारुप मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आले आहे.





