Teachers BLO Duty: शिक्षकांना मोठा दिलासा! बीएलओ कामाबाबत राज्य निवडणूक अधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
Teachers BLO Duty: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणूक आयोगाकडून आदेशात बदल; विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा गोंधळ मिटणार.

Teachers BLO Duty – मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेसाठी शाळा शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून पूर्णवेळ नियुक्ती दिलेली नाही. शिक्षकांना शाळांमधील शैक्षणिक कामे पुर्ण केल्यानंतर उर्वरित वेळेत, सुट्टीच्या दिवशी मतदारयाद्यांचे काम करण्याचे निर्देश राज्याचे सह मुख्य निवडणुक अधिकारी यांनी दिले आहेत. विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयाद्या दोषविरहीत व अचूक करण्यासाठी विशेष सखोल पुनरिक्षण २४ वर्षानंतर राबविण्यात येत आहे.
हे काम केंद्रीय निवडणूक आयोगाने ठरविलेल्या कालमर्यादेत काम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्त केलेले आहे. सर्वोच्च न्यायालयात शिक्षक संघटनांनी याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर निवडणूक आयोगाने आदेशात बदल करुन सुधारित आदेश जारी केले आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होताच शिक्षकांच्या बीएलओ म्हणून नियुक्त्या करण्यात आल्या.
या अतिरिक्त जबाबदारीमुळे विद्यार्थ्यांना शिकवायचे कधी असा प्रश्न शिक्षक व संघटनांनी उपस्थितीत केला होता. काही ठिकाणी शिक्षकांना बीएलओच्या कामासाठी कार्यमुक्त करण्यावरुन गोंधळ निर्माण झाला होता. शिक्षकांच्या अध्यापन कामामध्ये खंड पडू नये या कारणास्तव विशेष सखोल पुनरिक्षणाच्या कामासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियूक्त केलेल्या शिक्षकांना सुट्टीच्या दिवशी तसेच शैक्षणिक कर्तव्याच्या वेळेनंतर बीएलओचे कामकाज सोपविण्याच्या सूचना सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
त्याबाबतचे आदेश राज्याचे उपसचिव व सह मुख्य निवडणुक अधिकारी मनोहर पारकर यांनी जारी केले आहेत. शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून कामकाज पार पाडण्याकरीता पुरेसा वेळ मिळावा. काम कालावधीत पूर्ण व्हावे आणि त्यांच्यावर कामाचा ताणही येवू नये यासाठी सर्व शाळा प्रशासनांना सूचना दिल्या आहेत.
ज्यांना बीएलओची जबाबदारी दिली आहे, त्यांच्या शिक्षण तासिका कमीत कमी व सलग ठेवाव्यात. त्यांना नेहमीचे काम पूर्ण करुन उर्वरित वैळेत बीएलओची जबाबदारी पार पाडता येईल. बीएलओची जबाबदारी असणाऱ्यांना इतर शिक्षकांनी कामात मदत करावी, अशा सूचना दिल्या आहेत. यामुळे बीएलओची जबाबदारी असणाऱ्यांवर कामाचा भार पडणार नाही.






