पुणे जिल्हा | शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा कणा- सहकारमंत्री दिलीप वळसे

मंचर, (प्रतिनिधी) – शालेय विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजवणे, युवा पिढी घडवणे विद्यार्थ्यांच्या यश कल्याणासाठी आपले जीवन खर्ची घालणारे शिक्षक हे शिक्षण व्यवस्थेचा कणा असल्याचे मत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे पंचायत समिती आंबेगाव व जिल्हा विभाग यांच्या वतीने आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ कार्यक्रम प्रसंगी दिलीप वळसे पाटील बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिक्षणधिकारी संजय नाईकडे, गटशिक्षणाधिकारी सविता माळी, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, गुलाबराव वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विष्णूकाका हिंगे, सुभाषराव मोरमारे, संजय गवारी, इंदुबाई लोहकरे, कैलासबुवा काळे, रवींद्र करंजखेले, सोमनाथ काळे, प्रकाश घोलप, मथाजी पोखरकर,सुनील भेके, तुषार शिंदे, आत्माराम जगदाळे यांच्यासह शिक्षक संघटनांचे पदाधिकारी सर्व केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी सर्व शिक्षक उपस्थित होते.
यावेळी वळसे पाटील म्हणाले की, देशात व राज्यात शिक्षण पद्धतीत बदल होऊ लागला आहे. ज्याप्रमाणे शिक्षण पद्धतीत बदल होत आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांनी बदलणे गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या वतीने देशभरात शिक्षकांचा विकास करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहे. या उपक्रमाद्वारे शिक्षकांना प्रशिक्षण त्यांचे कौशल्य वाढावे यासाठी काम केले जात आहे.
शिक्षकांनी विद्यार्थी घडविल्यास व त्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास भविष्यात बेरोजगारीची समस्या कमी होणार आहे. असेही ते म्हणाले. यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, संजय नाईकडे, गुलाबराव वळसे यांचीही भाषणे झाली. तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून मृणाल गांजाळे, अरविंद मोढवे, महेश बढे यांची भाषणे झाली. सविता माळी यांनी प्रास्ताविक केले. अमित कातळे यांनी सूत्रसंचालन केले.
आंबेगावची सुशिक्षित तालुका म्हणून ओळख – आढळराव पाटील
पूर्वी आंबेगाव तालुक्याची अति दुर्गम तालुका म्हणून ओळख होती. मात्र, गेल्या वीस ते पंचवीस वर्षात आंबेगाव तालुक्याची शिक्षणात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली असून आज आंबेगाव तालुक्याची सुशिक्षित तालुका म्हणून ओळख झाली आहे. आंबेगाव तालुक्यात विविध प्रकारची शाळा, कॉलेज,
असल्याने अनेक तरुण मोठ्या पदावर कार्यरत आहेत. सध्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री असताना त्यांनी त्यांची जबाबदारी समर्थपणे पार पाडत उच्च व तंत्र शिक्षण पदाची ओळख महाराष्ट्राला करून दिली व राज्यात शिक्षण क्षेत्रात विविध संकल्पना राबवल्या, असेही आढळराव पाटील म्हणाले.





