बदली प्रक्रियेत शिक्षकांचा खोडसाळपणा

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 11 – प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाइन प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. मात्र, पात्र नसतानाही काही शिक्षकांकडून जाणीवपूर्वक खोट्या व चुकीच्या माहितीच्या आधारे अर्ज भरल्याचे निदर्शनास आले आहे, अशा प्राथमिक शिक्षकांवर कारवाई करण्याचा बडगा उगारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दोषी शिक्षकांचे बदली अर्ज बाद होणार असून त्यांची एक वेतनवाढ कायमस्वरुपी बंद करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास खात्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीसाठी चुकीची माहिती सादर करणारे शिक्षक अडचणीत सापडले आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी दि. 6 ते 9 ऑगस्ट या चार दिवसांत अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार शिक्षक बदलीची कार्यवाही 12 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर दि. 13 ऑगस्टला प्राथमिक शिक्षकांचे आंतरजिल्हा बदलीचे आदेश जारी केले जाणार आहे. ना हरकत प्रमाणपत्र धारक शिक्षक आणि विशेष संवर्ग-1 शिक्षकांना बदलीमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. परंतु, अर्ज करताना चुकीची माहिती सादर केली असल्याचे उघडकीस आले असल्याचे ग्रामविकास खात्याचे म्हणणे आहे.
कागदपत्र पडताळणीत खोट्या व चुकीच्या प्रमाणपत्र आधारे अर्ज भरल्याचे सिद्ध होईल, त्यांचा अर्ज ऑनलाइन प्रणालीतून संबंधित संवर्गातून बाद करण्यात येणार आहे. संबंधित शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरुपी बंद केले जाणार आहे. तसेच, अशा शिक्षकांना नव्याने अर्ज भरण्याची परवानगी दिले जाणार नाही.
– का. गो. वळवी, उपसचिव, राज्य शासन
बदल्यांच्या अर्जाची पडताळणी होणार…
जिल्हा परिषदेच्या आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करण्याची मुदत संपली आहे. चुकीची माहितीद्वारे अर्ज भरल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व शिक्षकांच्या कागदपत्राची पडताळणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे. त्यात संबंधित शिक्षकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी द्यावी. ह्या पडताळणीचे काम टप्प्याटप्प्याने दि. 12 ते 14 ऑगस्ट या दरम्यान कोणत्याही परिस्थिती पूर्ण करणे आवश्यक आहे, असेही राज्य सरकारने सर्व जिल्हा परिषदांना सूचित केले आहे.





