परभणी: परभणीच्या सेलू तालुक्यातील आडगाव दराडे येथील 35 वर्षीय शिक्षक सोपान पालवे यांनी मंगरूळ येथील नरसिंह प्राथमिक विद्यालयाच्या आर्थिक फसवणुकीला कंटाळून आत्महत्या केली आहे. परभणी तालुक्यातील आरपी रुग्णालयाजवळ झाडाला गळफास लावून त्यांनी जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या हृदयद्रावक चिठ्ठीत त्यांनी शाळेचे सचिव बळवंत खळीकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पालवे यांनी चिठ्ठीत म्हटले आहे की, शिक्षक नियुक्तीसाठी त्यांनी शेत विकून खळीकर यांना 20 लाख रुपये दिले. त्यानंतर 60% अनुदान टप्प्यासाठी 5 लाख रुपयांची अतिरिक्त मागणी झाली. मात्र, एवढे पैसे देऊनही त्यांना वेळेवर पगार मिळाला नाही. कधी 20% अनुदानाप्रमाणे कमी पगार, तर कधी पगारच मिळाला नाही. या आर्थिक पिळवणुकीमुळे नैराश्यात गेलेल्या पालवे यांनी टोकाचे पाऊल उचलले. परभणी ग्रामीण पोलिसांनी खळीकर यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पालवे यांच्या कुटुंबीयांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. नागपूर: 580 बोगस शिक्षक नियुक्त्यांचा घोटाळा दरम्यान, राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये 580 बोगस शिक्षक नियुक्त्यांचा मोठा घोटाळा उघड झाला आहे. खासगी प्राथमिक शाळांमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे केलेल्या या नियुक्त्यांमुळे सरकारी तिजोरीला कोट्यवधींचा फटका बसला आहे. शिक्षण विभागाने हा प्रकार मान्य केला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी 20 ते 35 लाख रुपये घेतल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही घटनांनी राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेतील गंभीर त्रुटी आणि भ्रष्टाचार उघड झाला आहे.