आधी शंका, सत्ता येताच EVMचं गुणगान! भाजपचं नाव घेत या पक्षाचा यू-टर्न…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, महायुतीने प्रचंड बहुमतासह दणदणीत विजय मिळवला आहे. याउलट, महाविकास आघाडीची धूळधाण झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेलं जनमत विधानसभा निवडणुकीत उलटं फिरलं कसं, यावर आता चर्चा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांनी थेट इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVMs) फेरफार झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे EVM वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
टीडीपीचा यू-टर्न
या चर्चेच्या पार्श्वभूमीवर, टीडीपीने (तेलगू देशम पक्ष) EVMविषयी थेट यू-टर्न घेतला आहे. एकेकाळी EVM प्रणालीवर तीव्र अविश्वास दाखवणाऱ्या टीडीपीने आता त्यावर विश्वास व्यक्त केला आहे. “EVM फेरफार न करता येण्याचं सत्य आता निर्विवादपणे सिद्ध झालं आहे. निवडणूक आयोगाने EVMवरील विश्वास वाढवण्यासाठी केलेलं काम अत्यंत कौतुकास्पद आहे. आमचा पक्ष आता EVMद्वारे मतदान प्रक्रियेला पूर्ण पाठिंबा देतो,” असं टीडीपीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या ज्योत्स्ना तिरुनागारी यांनी एका नामांकित वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं.
टीडीपीने २०१९च्या निवडणुकीतील पराभवानंतर EVM प्रणालीवर गंभीर शंका उपस्थित केल्या होत्या. त्यावेळी पक्षाने या यंत्रणेवर अविश्वास दाखवत निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली होती.
सुप्रीम कोर्टाचा निकाल
सुप्रीम कोर्टाने नुकतीच मतपत्रिकेद्वारे मतदान पुन्हा सुरू करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली. या निर्णयानंतर टीडीपीने EVM प्रणालीला पाठिंबा देत NDAसाठी पूरक अशी भूमिका घेतली आहे. पक्षाच्या या भूमिकाबदलामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला नवा विषय मिळाला आहे.
२०१९च्या पराभवानंतर पेटवलेलं आंदोलन
२०१९च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये टीडीपीचा मोठा पराभव झाला होता. १७५ जागांपैकी फक्त २३ जागांवर टीडीपीला विजय मिळाला. या पराभवानंतर पक्षाचे प्रमुख नारा चंद्रबाबू नायडू यांनी EVM प्रणालीवर थेट बोट ठेवलं होतं. त्यांनी त्यावेळी सोशल मीडियावर लिहिलं होतं, “EVM प्रणाली लोकशाहीसाठी गंभीर धोका आहे. प्रगत देशांमध्ये अशा प्रणालींचा वापर केला जात नाही.”
बदललेल्या भूमिकेवरून भाजपचा दाखला
मात्र, आता टीडीपीने आपली भूमिका बदलत निवडणूक आयोगावर विश्वास व्यक्त केला आहे. टीडीपीच्या एका ज्येष्ठ नेत्याने भाजप नेते लालकृष्ण अडवाणींचं उदाहरण देत स्पष्ट केलं, “२००९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर अडवाणींनी EVM प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. मात्र, आज भाजप EVMचा कट्टर समर्थक आहे. त्याचप्रमाणे, टीडीपीने पूर्वी शंका उपस्थित केली होती. मात्र, आता आम्ही निवडणूक आयोगाच्या प्रणालीला पाठिंबा देतो.”





