TCSचा दुसऱ्या तिमाहीतील नफा 1.4% वाढला; प्रति शेअर 11 रुपयांचा लाभांश जाहीर

मुंबई – दुसर्या तिमाहीत टीसीएस या सॉफ्टवेअर निर्यातदार कंपनीला झालेला नफा केवळ 1.4 टक्क्यांनी वाढून 12,075 कोटी रुपये झाला आहे. मात्र कंपनीचा महसूल 2.4 टक्क्यांनी वाढून 65,799 कोटी रुपये इतका झाला आहे. कंपनीने प्रति शेयर 11 रुपयाचा लाभांश जाहीर केला.
विश्लेषकांनी या तिमाहीत कंपनीला 12,573 कोटी रुपयाचा नफा होण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र प्रत्यक्षात झालेला नफा कमी आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत कंपनीला 11,909 कोटी रुपयांचा नफा झाला होता. तर गेल्या वर्षी या तिमाहीत कंपनीचा महसूल 64,259 कोटी रुपये इतका होता. आज कंपनीने जाहीर केलेला दुसरा अंतरीम लाभांश भागधारकांना 4 नोव्हेंबर 2025 रोजी दिला जाणार आहे.
कंपनीने सांगितले की, आमच्यासाठी देश -विदेशातील वातावरण अजूनही सकारात्मक असून बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा कंपन्याकडून आम्हाला अधिक ऑर्डर मिळत आहेत. कंपनीने म्हटले आहे की, आम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर भर देत आहोत. आता आम्ही जगातील कत्रीम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञान पुरवठादार करणारी सर्वात मोठी कंपनी आहोत. याचा आम्हाला अभिमान आहे.
या तिमाहीत कंपनीचा अमेरिकेतील व्यवसाय केवळ 0.1 टक्क्याने कमी झाला आहे. तर लॅटिन अमेरिकेतील व्यवसाय 1.8 टक्क्यांनी वाढला आहे. हा ताळेबंद कंपनीने शेअर बाजार बंद झाल्यानंतर जाहीर केला. तत्पूर्वी शेअर बाजारात या कंपनीच्या शेअरचा भाव 1.16 टक्क्यांनी वाढून 3,061 रुपये प्रति शेअर या पातळीवर होता.





