TCS ने कर्मचाऱ्यांची पगारवाढ रोखली? नक्की कारण काय? जाणून घ्या

TCS Salary Increment | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा भारतातील प्रमुख कंपन्यांवर देखील परिणाम पाहायला मिळत आहे. आर्थिक अनिश्चिततेच्या काळात भारतातील आघाडीची माहिती तंत्रज्ञान सेवा कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) एप्रिलपासून होणारी पगारवाढ सध्या स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरवर्षीय एप्रिल महिन्यात कंपनीकडून पगारवाढ केली जाते. परंतु, जागतिक स्तरावर निर्माण झालेली आर्थिक अनिश्चितता आणि अमेरिका तसेच इतर देशांतील टॅरिफ वॉर यामुळे कंपनीने हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
TCS चे चीफ ह्यूमन रिसोर्स ऑफिसर मिलिंद लक्कड यांनी सांगितले की, “सध्याच्या परिस्थितीत पगारवाढीचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आणि स्पष्टता मिळाल्यावर योग्य वेळी पगारवाढ केली जाईल.” पुढील काही महिन्यात पगारवाढीचा निर्णय घेतला जाईल, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
TCS चा हा निर्णय 2020 मध्ये कोविड महामारीच्या काळात घेतलेल्या निर्णया सारखा आहे. त्या वेळीही जागतिक मंदीमुळे खर्चात कपात करण्यात आली होती. सध्या संपूर्ण IT क्षेत्रात अस्थिरतेचं वातावरण असून, इन्फोसिस, विप्रो यांसारख्या कंपन्याही असाच निर्णय घेऊ शकतात, अशी शक्यता आहे.
तसेच, कंपनीने स्पष्ट केलं आहे की चालू तिमाहीत सुमारे 70 टक्के कर्मचाऱ्यांना 100 टक्के व्हेरिएबल पे दिलं जाईल. उर्वरित कर्मचाऱ्यांचा बोनस त्यांच्या कामगिरीवर आधारित असेल.
42,000 नव्या इंजिनिअर्सची भरती
सद्य परिस्थिती असूनही, TCS ने 2025-26 या आर्थिक वर्षात कॅम्पस प्लेसमेंटद्वारे सुमारे 42,000 इंजिनिअर्सची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आकडे मागील वर्षीच्या भरतीच्या तुलनेने जवळपास समान आहेत. मार्च 2025 मध्ये कंपनीने 625 नव्या कर्मचाऱ्यांना भरती केलं असून, वर्षभरात ही संख्या एकूण 6,433 इतकी होती. त्याचवेळी, मागील वर्षाच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या 13,249 ने घटली होती.
मार्च 2025 अखेरीस, कंपनीमध्ये एकूण 6,07,979 कर्मचारी कार्यरत आहेत. याच तिमाहीत कंपनीचे नोकरी सोडणाऱ्यांचे प्रमाण 13.3 टक्क्यांवर पोहोचले आहे.





