भारतीय चलानावर तथागत गौतम बुद्ध यांचा फोटो लावावा – सचिन खरात

दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारकडे एक अजब मागणी केली. भारतीय चलनांमध्ये येणाऱ्या नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबतच गणपती आणि लक्ष्मीचाही फोटो असायला हवा, असे ते म्हणाले. त्यामुळे सुख-समृद्धी येईल आणि संपूर्ण देशाला त्याचा आशीर्वाद मिळेल. नव्या नोटांनी याची सुरुवात करता येईल, असे ते म्हणाले. यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिणार आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी नोटांवर लक्ष्मी आणि गणेशाची फोटो छापण्याची मागणी केल्यानंतर आता याप्रकरणी अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेत्यांनी तर नोटांवर फोटो छापण्यासाठी काही पर्यायही सुचवले. याचसंदर्भात (Sachin Kharat on Currency Note) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी भारतीय चलानावर तथागत गौतम बुद्ध यांचा फोटो लावावा अशी मागणी केली आहे.
भारत देशाची ओळख #गौतमबुद्ध आहे. तथागत गौतम बुद्धांनी जगाला पहिल्यांदा लोकशाही दिली आणि तथागत गौतम बुद्ध आपल्या देशाची अस्मिता आहे त्यामुळे माननीय पंतप्रधान साहेब आपल्याला मागणी करत आहे भारतीय चालनावर तथागत गौतम बुद्ध यांचा फोटो घ्यावा.@narendramodi
— SACHIN KHARAT RPI राष्ट्रीय अध्यक्ष (@RPIsachinkharat) October 27, 2022
सचिन खरात यांनी म्हटले आहे की, भारत देशाची ओळख गौतम बुद्ध आहे. तसेच जगातील प्रत्येक माणूस भारताला गौतम बुद्धांचा देश म्हणून ओळखतो आणि भारतातील आजपर्यंत जे पंतप्रधान झाले त्यांनी भारत देश गौतम बुद्धांचा आहे. हे मोठया अभिमानाने सांगितले आणि तथागत गौतम बुद्धांनी जगाला पहिल्यांदा लोकशाही दिली आणि तथागत गौतम बुद्ध आपल्या देशाची अस्मिता आहे. त्यामुळे माननीय पंतप्रधान यांना मागणी करत आहे की भारतीय चालनावर तथागत गौतम बुद्ध यांचा फोटो घ्यावा.
तसेच सचिन खरात यांनी याच मुद्यांवरून अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, अरविंद केजरीवाल ज्यावेळी जनतेला संबोधित करतात त्यावेळी मागे संविधाननिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानानुसार भारत देश धर्मनिरपेक्ष आहे. तसेच भारत देश सर्वधर्मसमभाव मानतो. तरीसुद्धा आता अरविंद केजरीवाल यांनी विशिष्ट धर्माच्या देवांचे फोटो नोटावर घ्या अशी मागणी केल्याचे समजते यावरून अरविंद केजरीवाल हे हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहेत हे स्पष्ट दिसून आले. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्याचा अधिकार नाही.




