Tata Motors : टाटा मोटर्सकडून दरकपात जाहीर

नवी दिल्ली : टाटा मोटर्स कंपनीने आपल्या विविध वाहनांच्या दरात 65 हजार रुपये ते 1.45 लाख रुपयापर्यंत दर कपात जाहीर केली आहे. जीएसटी कपातीचा पूर्ण फायदा ग्राहकांना पहिल्या दिवसापासून म्हणजे 22 सप्टेंबरपासून देण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्रा यांनी सांगितले की, जीएसटी परिषदेच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. आमच्या विविध वाहनांच्या दरात कपात करीत आहोत. त्यामुळे वैयक्तिक वाहन वापर करणार्यांची संख्या वेगाने वाढणार आहे. विशेषतः छोट्या कारची विक्री वेगाने वाढण्यास मदत होणार आहे.
जीएसटी परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार बहुतांश कारवरील जीएसटी आता 28% वरून केवळ 18 % इतका होणार आहे. दरम्यान टाटा मोटर्सने जाहीर केलेल्या या दर कपातीनंतर लवकरच इतर वाहन कंपन्या दर कपात करणार आहेत. त्यामुळे दसरा- दिवाळीत वाहन विक्री वेगाने वाढण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून वाहन कंपन्या आपली वाहने वितरकाकडे वेगाने पाठविण्याची शक्यता आहे.





