Tata Motors Price Hike : टाटाच्या कार 25 हजारांपर्यंत महागणार; 1 सप्टेंबरपासून नवे दर, जाणून घ्या कारण
Tata Motors Price Hike : टाटा मोटर्सच्या कार आणि SUV 1 सप्टेंबर 2026 पासून 25 हजार रुपयांपर्यंत महागणार आहेत. पेट्रोल-डिझेलसह EV वरही दरवाढीचा परिणाम होणार.

Tata Motors Price Hike : टाटा मोटर्सच्या कार खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्या बजेटवर अतिरिक्त भार पडणार आहे. कंपनीच्या संपूर्ण पॅसेंजर व्हेईकल रेंजच्या किमती 1 सप्टेंबर 2026 पासून वाढणार आहेत. पेट्रोल-डिझेल कारसोबत इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीही वाढणार आहेत.
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्सने आपल्या कार आणि एसयूव्हीच्या संपूर्ण रेंजच्या किमतीत 25 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. मात्र, प्रत्येक कारची किंमत 25 हजार रुपयांनी वाढणार नाही. मॉडेल आणि व्हेरिएंटनुसार दरवाढ वेगवेगळी असेल. कंपनीकडून संबंधित मॉडेल्सच्या नव्या किमती अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.
1 सप्टेंबरपासून लागू होणार नवे दर
टाटा मोटर्सच्या पॅसेंजर व्हेईकल रेंजमध्ये पेट्रोल-डिझेल वाहनांसह इलेक्ट्रिक कारचाही समावेश आहे. त्यामुळे 1 सप्टेंबरनंतर टाटाची कार किंवा एसयूव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सध्याच्या तुलनेत अधिक रक्कम मोजावी लागू शकते. गणेशोत्सव किंवा नवरात्रोत्सवात कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांनी याची नोंद घेणे महत्त्वाचे आहे.
वाढत्या इनपुट कॉस्टचा परिणाम
कंपनीने दरवाढीमागे वाढती इनपुट कॉस्ट आणि महागाईचा दबाव हे प्रमुख कारण सांगितले आहे. स्टील, अॅल्युमिनियमसह विविध कच्चा माल आणि उत्पादनाशी संबंधित खर्च वाढल्याने वाहन कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होतो. वाढलेल्या खर्चाचा मोठा हिस्सा कंपनी स्वतः सहन करत असली तरी काही भार ग्राहकांवर टाकणे आवश्यक असल्याचे टाटा मोटर्सने स्पष्ट केले आहे.
2026 मध्ये तिसऱ्यांदा दरवाढ
टाटा मोटर्सकडून 2026 मध्ये करण्यात येणारी ही तिसरी दरवाढ आहे. यापूर्वी 1 एप्रिलपासून पेट्रोल-डिझेल मॉडेल्सच्या किमतीत सरासरी 0.5 टक्के वाढ करण्यात आली होती. त्यानंतर 1 जुलैपासून संपूर्ण पॅसेंजर व्हेईकल पोर्टफोलिओच्या किमतीत सुमारे 1.5 टक्के वाढ करण्यात आली. आता 1 सप्टेंबरपासून पुन्हा 25 हजार रुपयांपर्यंत दरवाढ होणार आहे.
मारुती, ह्युंदाईकडूनही दरवाढ
टाटा मोटर्सपूर्वी ह्युंदाईने 2026 मधील तिसऱ्या दरवाढीची घोषणा केली होती. मारुती सुझुकीनेही अलीकडच्या काही महिन्यांत आपल्या संपूर्ण पोर्टफोलिओच्या किमती दोन वेळा वाढवल्या आहेत. टाटा मोटर्सने अद्याप मॉडेलनिहाय दरवाढ जाहीर केलेली नसल्याने एखाद्या विशिष्ट कारची अचूक किंमत जाणून घेण्यासाठी ग्राहकांनी 1 सप्टेंबरच्या आसपास डीलरशी संपर्क साधणे अपेक्षित आहे.





