टाटा मोटर्सने खरेदी केला फोर्ड कंपनीचा गुजरातचा प्रकल्प
Updated On:

मुंबई – टाटा मोटर्स कंपनीने फोर्ड कंपनीचा गुजरात मधील प्रकल्प खरेदी केला आहे. यासंदर्भात टाटा मोटर्स, फोर्ड इंडिया आणि गुजरात सरकारदरम्यान त्रिपक्षीय करार झाला.
या कराराअंतर्गत सानंद येथील फोर्ड कंपनीची जमीन, कारखाना, वाहन निर्मितीचे यंत्रसामुग्री टाटा मोटर्सकडे येणार आहे. यासंदर्भात टाटा मोटर्सने शेअर बाजारांना माहिती कळविली आहे. फोर्ड कारखान्यातील सर्व कामगार टाटा मोटर्समध्ये सामील होणार आहेत. या कारखान्यातून टाटा मोटर्स इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणार असल्याचे टाटा मोटर्स कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या व्यवहाराची औपचारीकता पुढील दोन ते तीन आठवड्यात संपणार आहे. या अधिग्रहणानंतर टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन विभागाची उत्पादनक्षमता तीन लाख वाहन प्रति वर्ष इतकी होणार आहे. ती चार लाखापर्यंत वाढविता येऊ शकणार आहे.





