Taslima Nasrin : भारतात समान नागरी कायद्याची गरज; तस्लीमा नसरीन यांनी केली मागणी
निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन (Taslima Nasrin) यांनी भारतात समान नागरी कायदा लागू करण्याची जोरदार मागणी केली आहे.

Taslima Nasrin : निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन (Taslima Nasrin) यांनी भारतात समान नागरी कायदा लागू करण्याची जोरदार मागणी केली आहे. विशेषतः महिलांवरील भेदभाव दूर करण्यासाठी असा कायदा अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासोबतच बांगलादेश आणि पाकिस्तानातही समान नागरी कायद्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कोलकाता येथील पत्रकार परिषदेत ६३ वर्षीय नसरीन (Taslima Nasrin) म्हणाल्या, सर्व प्रगत देशांमध्ये युसीसीसारखे कायदे आहेत. बांगलादेश, पाकिस्तान आणि भारताला समान नागरी कायद्याची गरज आहे. सर्वांसाठी समान कायदा असायला हवा. महिलांना मोठ्या प्रमाणावर भेदभावाचा सामना करावा लागतो, जो समान नागरी कायद्यामुळे दूर केला जाऊ शकतो. हा कायदा अत्यंत आवश्यक आहे.
बांगलादेशचा उल्लेख करताना नसरीन म्हणाल्या की, समता हा कोणत्याही सभ्यतेचा पाया असतो, परंतु आजही अनेक महिलांना भेदभावाला सामोरे जावे लागत आहे. बांगलादेशात हिंदू महिलांना समान हक्क नाहीत. त्या त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेत हक्क सांगू शकत नाहीत. जर हिंदू महिलांना स्वातंत्र्य आणि समान हक्क मिळवून द्यायचे असतील तर समान नागरी कायदा लागू करणे गरजेचे आहे.
जवळपास १९ वर्षांनंतर कोलकात्यात परतलेल्या नसरीन यांचा शनिवारी रवींद्र सदन येथे राज्य सरकारच्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. २००७ मध्ये त्यांच्या द्विखंडितो या पुस्तकाच्या प्रकाशनावरून झालेल्या तीव्र निदर्शनांमुळे तत्कालीन डाव्या आघाडीच्या सरकारला त्यांना शहरातून हलवावे लागले होते.
सत्कार समारंभात झालेल्या गदारोळावर नसरीन (Taslima Nasrin) यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. प्रसिद्ध कवी जॉय गोस्वामी यांना प्रेक्षकांच्या एका गटाच्या विरोधामुळे भाषण न करताच व्यासपीठ सोडावे लागल्याने आपल्याला अपमानित वाटल्याचे त्यांनी सांगितले. केवळ जॉय यांचाच नाही, तर मी त्यांना आमंत्रित केले असल्यामुळे माझाही अपमान झाला आहे, असे नसरीन म्हणाल्या.






