‘टॅरिफ लादणं बेकायदेशीर’; अमेरिकेच्या कोर्टाचा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका

Trump Tariff News| अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना टॅरिफ प्रकरणी अमेरिकन न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. यूएस कोर्ट ऑफ अपील्स द फेडरल सर्किट यांचं म्हणणं आहे की, ट्रम्प यांनी लादलेले बहुतांश टॅरिफ हे बेकायदेशीर आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आणीबाणीच्या परिस्थितीतले अधिकार प्राप्त आहेत पण त्यामध्ये टॅरिफ लादण्याचा अधिकार नाही.
या निर्णयानंतर अमेरिकेच्या आर्थिक धोरणांना फटका बसला आहे. अमेरिकन लोकशाहीत न्यायव्यवस्थेची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. मात्र, कोर्टाने १४ ऑक्टोबरपर्यंत टॅरिफ कायम ठेवण्याची परवानगी दिली असल्याने ट्रम्प प्रशासनाला सुप्रीम कोर्टात अपील करण्याची संधी मिळाली आहे.
ट्रम्प यांनी निर्णयाला फेटाळले
दुसरीकडे, ट्रम्प यांनी कोर्टाचा निर्णय फेटाळत चुकीचे आणि पक्षपाती म्हटले आहे. त्यांनी सोशलवर पोस्ट करत म्हटले की, “सर्व टॅरिफ अजूनही लागू आहेत. ही पक्षपाती अपील कोर्टाने चुकीने घेतलेला निर्णय आहे. शेवटी अमेरिकेचाच विजय होईल. जर हे टॅरिफ काढले गेले तर देशासाठी मोठी आपत्ती होईल.
अमेरिका आता असा व्यापारात तोटा सहन करणार नाही. हे टॅरिफ अमेरिकन मजूरांसाठी आणि ‘मेड इन अमेरिका’ उत्पादनांसाठी आवश्यक आहे. सर्वांनी लक्षात ठेवावे की, टॅरिफ हे आमचे मजूर आणि कंपन्या मजबूत करणारे साधन आहे. सुप्रीम कोर्टाच्या मदतीने आम्ही अमेरिकेला पुन्हा समृद्ध, शक्तिशाली बनवू,” असाही इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
सुप्रीम कोर्टाच्या मदतीने टॅरिफचा वापर देशाच्या हितासाठी करणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले. यामुळे आता हे प्रकरण आणखी लांबण्याची शक्यता आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे भारत आणि अमेरिकेतील अनेक वर्षांचे चांगले संबंध हे वाईट होताना सध्या दिसत आहेत. रशियाकडून तेल खरेदी भारताने बंद करावी, यासाठी त्यांनी थेट 50 टक्के टॅरिफ लावले. शिवाय जर रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केले तर तुमच्यावरील 25 टक्के टॅरिफ हा काढला जाईल, असेही अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा:
मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी; भाजप आमदाराचे थेट विधानसभा अध्यक्षांना पत्र





