टार्गेट ठरलं..! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईतील सभेसाठी शिंदे गट जमावणार गर्दी

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मुंबईत येत आहे. नरेंद्र मोदी मुंबईतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार असून मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 चे लोकार्पण त्यांच्या हस्ते होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपने जोरदार तयारी केली आहे. या संदर्भात आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर महत्त्वपुर्ण बैठक होणार आहे. भाजपने मिशन मुंबई महापालिका निवडणूक सुरू केलं आहे. मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या दौऱ्याला मोठे महत्त्व आहे.
मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या १९ जानेवारी रोजी मुंबईत होणाऱ्या सभेच्या नियोजनाबाबत बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप पदाधिकार्यासोबत मंत्री @dvkesarkar जी तसेच आमदार @ShelarAshish जी यांनी बैठक घेऊन दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ##MumbaiAwaitsModi pic.twitter.com/YQTTrDQnna
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) January 15, 2023
दरम्यान, मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील विविध विकास योजनांचे लोकार्पण करून मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केल्याचं सांगितलं जात आहे.
शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनीही ट्विट करून कालच्या सभेची माहिती दिली. मुंबईत होणाऱ्या सभेच्या नियोजनाबाबत बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांसोबत मंत्री दीपक केसरकर आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी बैठक घेतली. या दोन्ही नेत्यांनी दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले, असं ट्विट शीतल म्हात्रे यांनी केलं आहे.
तसेच, शिंदे गटाकडून ठाणे जिल्ह्यातून अधिकाधिक माणसं आणली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, शिंदे गटाच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना पंतप्रधानांच्या सभेला माणसं आणण्याचे फर्मान सोडलं आहे. अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.





