मुंबई – भूखंडाचा आरोप, अंजली दमानिया यांचा ससेमिरा, दाऊदच्या बायकोसोबत माझे संबंध कोणी जोडले असे सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी माझे फोन टॅप केले, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केले.
जळगावात एका कार्यक्रमात बोलताना खडसे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना एक नोटीस आली आणि काय त्यांचा तळफळा सुरु झाला, एक नोटीस आली आणि आपली पिळवणूक होत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. मी भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून माझी पिळवणूक सुरू झाली, असा दावा करत आहेत. तुम्ही नाथाभाऊंची पिळवणूक केली नाही का?, मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होतो हे तुम्हाला माहिती पडताच तुम्ही माझी पिळवणूक सुरू केली, असा आरोप खडसे यांनी फडणवीसांवर केला.
माझ्यामागे जमीन भूखंड प्रकरण, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बायको बरोबर माझे संबंध जोडले. अंजली दमानिया यांना माझ्यावर आरोप करायला लावलं, हे उद्योग कोणी केले?, असा सवाल करत फडणवीसांच्या कालखंडात माझे फोन टॅप झाले, फोन कोणाचे टॅप होतात ज्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, त्यांचेच फोन टॅप होतात. माझे काय देशद्रोहीसोबत संबंध आहे का?, असा थेट सवाल खडसे यांनी केला.
तुम्ही आजपर्यंत विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचं काम केले, म्हणूनच माझ्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येण्याची वेळ आली, असे खडसे म्हणाले.